Women’s World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ महिला संघाने संपवला. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने विविध सामन्यांमध्ये योगदान देत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पण यादरम्यान टीम इंडियाची एक महत्त्वाची फलंदाज हाताच्या बोटाला फ्रॅक्चर असतानाही वेदना सहन करत खेळत होती.
स्पर्धेतील सांघिक कामगिरीच्या जोरावरच टीम इंडिया चॅम्पियन ठरली. प्रत्येक सामन्यात विविध खेळाडूने जबाबदारी घेत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यादरम्यान भारताची सलामीवीर प्रतिका रावल हिला दुखापत झाली. बांगलादेशविरूद्ध सामन्यात फिल्डिंग करताना तिला दुखापत झाल्याने ती सेमीफायनल, फायनलमधून बाहेर पडली होती. याचबरोबर टीम इंडियाची एक अशी महत्त्वाची खेळाडू होती, जी दुखापत झालेली असताना नॉकआऊट सामने खेळली.
भारताकडून विश्वचषकात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषही आहे. रिचाने खालच्या फळीत फिनिशर म्हणून आपली भूमिका निभावताना एकापेक्षा एक कमालीच्या खेळी केल्या. स्पर्धेच्या उत्तरार्धात भारताची टॉप ऑर्डर धडाकेबाज कामगिरी करत असल्याने तिचं योगदान काहीसं दुर्लक्षित राहिलं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात रिचाने आणखी एक आक्रमक खेळी करत विश्वचषकातील विक्रमाची बरोबरी केली. रिचाला न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर ती बांगलादेशविरूद्ध सामन्यात खेळली नव्हती. पण सेमीफायनसारख्या महत्त्वाच्या सामन्यात ती खेळण्यासाठी उतरली.
रिचा घोष दुखापत असतानाही खेळत असल्याचा मोठा खुलासा तिच्या बालपणीच्या कोचने आता विश्वचषक विजयानंतर केला आहे. तिचे बालपणीचे कोच म्हणाले, “सेमीफायनलपूर्वी तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला हेअरलाइन फ्रॅक्चर झालं होतं, तरीही ती वेदना सहन करत फलंदाजीसाठी उतरली. त्या दुखण्यातही ती खेळत राहिली आणि हेच तिच्या अद्भुत मानसिक ताकदीचं प्रतीक आहे,” असं कोच पॉल यांनी सांगितलं.
“मी तिला आधीच सांगितलं होतं, ती कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी आली तरी, तिने आपल्या प्रत्येक फटक्यावर विश्वास ठेवत खेळलं पाहिजे आणि तिने तेच केलं,” असं पॉल पुढे म्हणाले.
कोच शिवशंकर पॉल म्हणाले, “आजच्या क्रिकेटच्या जगात प्रत्येक खेळाडूची ताकद, कमजोरी, खेळाडू कोणत्या भागात फटका मारू शकत नाही; याचं बारकाईने विश्लेषण केलं जातं. अशा परिस्थितीत तुम्हाला सतत बदल, सुधारणा आणि जुळवून घेणं आवश्यक असतं, नाहीतर तुम्ही मागे पडता.”
“ऋचाने आपली तंत्र सुधारण्यासाठी किती मेहनत घेतली, हे फक्त तिलाच माहित आहे. आपण आज जे पाहतोय ते म्हणजे तिच्या त्या सततच्या मेहनतीचं फळ आहे. ती दररोज सात-सात तास सराव करत होती. जर एखादा खेळाडू प्रामाणिकपणे मेहनत घेत असेल, तर यश नक्कीच मिळतं,” असं पॉल पुढे म्हणाले.
