Ricky Ponting compared Ben Stokes to MS Dhoni: इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत १५५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला सामन्यात ४३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले, पण स्टोक्सच्या खेळीने सामना नक्कीच रोमांचक झाला. आता यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने स्टोक्सचे कौतुक करताना त्याची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली आहे. पाँटिंगच्या मते, स्टोक्समध्ये सामने जिंकवून देण्याची क्षमता धोनीसारखीच आहे.

लॉर्ड्स कसोटी सामन्यातील बेन स्टोक्सच्या खेळीबद्दल बोलताना रिकी पाँटिंग आयसीसी रिव्ह्यूमध्ये म्हणाला की, “स्टोक्स पुन्हा हेडिंग्ले टेस्ट मॅचसारखं काहीतरी करणार आहे की काय, असं मला आणि सगळ्यांनाच त्यावेळी वाटलं होतं. यावेळी लक्ष्य थोडे जास्त असले, तरी त्याने वेगवान धावा करण्यास सुरुवात केल्यावर सर्वांना ती कसोटी आठवली. या सामन्यातही स्टोक्सचा झेल स्मिथने सोडला, तर मार्कस हॅरिसनेही हेडिंग्लेत त्याचा झेल सोडला होता.”

कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू दडपणाखाली असतो –

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू पुढे म्हणाला की, “मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू दडपणाखाली असतो. बेन स्टोक्स फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर उतरतो आणि त्याला संघाला विजय मिळवून देण्याची संधी देखील अधिक असते. अशा परिस्थितीत माझ्या मनात पहिले नाव येते, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे. ज्याने टी-२० फॉरमॅटमध्ये अनेक वेळा सामना फिनिश केला आहे. स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये असेच काहीसे करताना दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून असा पराक्रम कोणत्याही खेळाडूला करता आला असेल, असे मला वाटत नाही.”

हेही वाचा – Rinku Singh: रिंकू सिंगने हवेत उडी मारत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, VIDEO होतोय व्हायरल

आता सर्वांचे लक्ष हेडिंग्ले कसोटीकडे लागले आहे –

लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा पराभव झाल्यानंतर आता ॲशेस मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला उर्वरित तीनही सामने जिंकणे आवश्यक आहे.जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटनंतर या मालिकेचा थरार आता वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ६ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या हेडिंग्ले कसोटी सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोस टंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.