Harbhajan Singh Statement on Rinku Singh : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ सुरू होण्यासाठी आता जास्त वेळ उरलेला नाही. या मेगा टूर्नामेंटसाठी जगभरातील सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाची तयारीही सुरू झाली असून या मेगा टूर्नामेंटसाठी भारतीय क्रिकेट संघाचा १५ सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. आता भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने विश्वचषकाच्या संघ निवडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. वास्तविक, हरभजनने रिंकू सिंगच्या संघात अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला रिंकू सिंगची उणीव भासणार असल्याचे भज्जीचे मत आहे.

हरभजन रिंकूबद्दल काय म्हणाला?

अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला संधी दिली नाही. याबाबत एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “एकंदरीत संघ चांगला आहे, पण मला वाटते की संघात एक वेगवान गोलंदाज कमी आहे. त्याचबरोबर रिंकू सिंगचा समावेश मुख्य संघात करायला हवा होता. भारतीय संघाला त्याची उणीव भासेल. कारण तो असा खेळाडू आहे, जो २० चेंडूत ६० धावा करू शकतो आणि स्वत:च्या जोरावर भारताला सामने जिंकवून देऊ शकतो. तसेच चार फिरकीपटू खूप आहेत. कारण तीन पुरेसे होते. एका सामन्यात चार फिरकीपटू कधीच एकत्र खेळणार नाहीत. आता संघाची निवड झाली आहे, मी टीम इंडियाला शुभेच्छा देतो आणि चषक परत आणण्याची आशा करतो.”

पंत-सॅमसनला मिळाली संधी –

संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. याबद्दल माजी गोलंदाज म्हणाला, “ऋषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळत होता. दुखापतीतून बाहेर आल्यानंतर तो तंदुरुस्त दिसत होता, त्याची विकेटकीपिंग चांगली होती. फलंदाजीही सर्वोत्तम नव्हती पण चांगली होती. त्यामुळे मला वाटते की हा निर्णय आहे. पण मला वाटतं संजू सॅमसनला संधी मिळावी, कारण तो चांगला खेळत आहे. मला आशा आहे की ऋषभ पंत भारतासाठी चांगला खेळेल आणि काहीतरी खास करेल.”

हेही वाचा – Team India : एमएस धोनी BCCIसाठी ठरू शकतो ट्रम्प कार्ड, बोर्ड मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी घेणार मदत

टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला होणार –

भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर ९ जून रोजी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना खेळणार आहे. यानंतर भारताला १२ जूनला अमेरिका आणि १५ जूनला कॅनडाविरुद्ध खेळायचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.