Rishabh Pant Run Out Ben Stokes Video: ऋषभ पंत आणि त्याचे सामन्यातील बाद होण्याचे अनेक विविध प्रकार आहेत. पंत कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या विस्फोटक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण याचबरोबर तो अनोख्या पद्धतीने बाद देखील होत असतो. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतही पंत असाच बाद झाला आहे. ऋषभ पंतला कर्णधार बेन स्टोक्सने कमालीच्या थ्रोवर रनआऊट केलं आहे. ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेला आणि महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. केएल राहुलचं शतक तर ऋषभ पंतच्या अर्धशतकी खेळीसह दोघांनी मिळून १४१ धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या दिवसाची दणक्यात सुरूवात केल्यानंतर राहुल आणि पंतने धावांचा वेग कमी केला. यादरम्यान पंत आणि डकेटमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. पण लंचब्रेकच्या काही मिनिटआधी पंत धावबाद झाला.

भारताच्या पहिल्या डावात, ऋषभ पंतने शोएब बशीरचा चेंडू हलक्या हाताने खेळला. केएल राहुल धाव घेण्यासाठी धावला पण ऋषभ पंतने उशिराने त्याची क्रिझ सोडली. दरम्यान, बेन स्टोक्सनेही चेंडू पकडला आणि नॉन-स्ट्रायकर एंडकडे फेकला. पंत उशिरा धावल्याने वेळेत नॉन स्टायकरला पोहोचला नाही आणि स्टोक्सच्या रॉकेट थ्रोने थेट त्रिफळा उडवला. स्टोक्सने पंतने टोलवलेला चेंडू लगेच उचलला आणि कमालीचा थ्रो करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

इंग्लंडसाठी ही विकेट महत्त्वाची होती कारण ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची मौल्यवान भागीदारी रचली होती. या विकेटची मोठी गोष्ट म्हणजे ऋषभ पंतने लंचच्या अगदी काही मिनिटआधी विकेट गमावली. पंत पुन्हा एकदा नव्या अंदाजात बाद झाल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाने त्याआधी पहिले तीन विकेट १०७ धावांत गमावले आणि संघाला ऋषभ पंतकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. ऋषभ पंतने सुरुवात खूप संथ केली पण जेव्हा तो मैदानात स्थिरावला त्यानंतर त्याने आक्रमक फटके खेळायला सुरूवात केली. मात्र, पंत बाद होताच कर्णधार शुबमन गिलही निराश दिसला. ऋषभ पंतच्या धावबाद होण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.