Robin Uthappa On Virat Kohli: भारतीय संघाला २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. या स्पर्धेत भारतीय संघाने घेतलेला एक निर्णय तुफान चर्चेत राहिला होता, तो म्हणजे अंबाती रायुडूला बाहेर ठेवून विजय शंकरला संघात स्थान देण्याचा निर्णय. त्यावेळी अंबाती रायुडू दमदार फॉर्ममध्ये असूनही थ्री डी प्लेअर म्हणून विजय शंकरचा संघात समावेश करण्यात आला होता. या निर्णयावरून विराट कोहलीवर जोरदार टीका करण्यात आली होती.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने विराटने घेतलेल्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे विराटशी असलेले चांगले संबंध बिघडल्याचा खुलासा रॉबिन उथप्पाने एका मुलाखतीत केला आहे. उथप्पाने रायुडू आणि युवराजला संघात स्थान न दिल्यामुळे देखील नाराजी व्यक्त केली होती. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अंबाती रायुडूला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याच्या नावाची चर्चा असतानाही विजय शंकरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तर युवराज सिंगला देखील दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याने २०१९ मध्ये फेअरवेल सामना न खेळताच निवृत्तीची घोषणा केली होती.
अलीकडेच उथप्पाने याबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने स्पष्ट केलं आहे की, त्याला विराट कोहलीवर टीका करायची नव्हती. त्यावेळी त्याने मुलाखतीत बोलताना फक्त त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे पुढे जाऊन विराटसोबत असलेले संबंध बिघडतील याचा त्याने विचार केला नव्हता. त्याने विराटबद्दल राष्ट्रीय टेलिव्हिजनवर कुठलंही वक्तव्य करताना आधी विराटसोबत चर्चा करायला हवी होती. पण त्याने तसं काहीच न करता, मुलाखत दिली हा त्याच्यासाठी सर्वात मोठा धडा होता,असं त्याने सांगितलं.
विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा दोघेही खूप चांगले मित्र आहेत. बरेच वर्ष दोघेही एकत्र भारतीय संघासाठी खेळले. रॉबिन उथप्पा हा २००७ टी-२० वर्ल्डकपविजेत्या संघातील खेळाडू आहे. उथप्पाने विराट कोहलीआधी भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. मात्र, या मुलाखतीनंतर दोघांमध्ये असलेले संबंध बिघडले होते. त्यावेळी त्याला कुठे काय बोलावं याचं महत्वं कळालं होतं.