Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये गेल्या १० सामन्यांमध्ये भारतीय संघानं तुफान कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. एकही सामना न गमावणारा भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी पहिली पसंती ठरला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं ६ विकेट्सनं भारताचा पराभव करत तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं. या पराभवावर आता क्रिकेट जाणकार व आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये चर्चा सुरू झाली आहे. खुद्द कर्णधार रोहित शर्मानं या पराभवामागचं कारण सांगितलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जल्लोष करत मैदानात येत असताना दुसरीकडे भारतीय खेळाडूंना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं. खुद्द कर्णधार रोहित शर्मालाही अश्रू अनावर झाले. सघळ्यांना हस्तांदोलन केल्यानंतर रोहित शर्मा वेगाने ड्रेसिंग रुमच्या दिशेनं मैदानाबाहेर पडला. यावेळी त्याच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते.

“मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे”

सामन्यानंतरच्या कार्यक्रमात रोहित शर्माला रवी शास्त्रींनी पराभवासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता रोहित शर्मानं आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीवर अभिमान असल्याचं ताठ मानेनं सांगितलं. “सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आज आम्ही विजयासाठी आवश्यक तेवढा चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे”, असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

Ind vs Aus Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

“विराट-राहुल फलंदाजी करत होते तेव्हा…”

“खरंतर आणखी २०-३० धावा झाल्या असत्या, तर कदाचित आम्हाला आणखी मदत झाली असती. जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते, तेव्हा आम्ही २७०-२८० धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. पण सातत्याने आमचे गडी बाद होत गेले”, असं रोहित शर्मानं यावेळी कबूल केलं.

ट्रेविस हेड-मार्नस लाबुशेनचं कौतुक

दरम्यान, यावेळी बोलताना रोहित शर्मानं ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या भागीदारीचं कौतुक केलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची विजयी भागीदारी केली. “तीन गडी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एक मोठी भागीदारी रचली. २४० धावा फलकावर लागल्या असताना आम्हाला सुरुवातीला गडी बाद करणं आवश्यक होतं. आम्ही त्यांचे तीन गडी बाद केलेही. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं श्रेय ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांना दिलं पाहिजे”, असं रोहित शर्मानं नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांनी हा सामना आमच्या हातातून काढून नेला. मला वाटतं संध्याकाळी खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी चांगली झाली. हे असं होईल याची आम्हाला कल्पना होती. पण अर्थात, या पराभवासाठी मला ते कारण द्यायचं नाहीये. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या विजयाचं श्रेय नक्कीच ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या भागीदारीला जातं”, असं रोहितनं मान्य केलं.