IND vs AUS Champions Trophy Semi Final Updates in Marathi: भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलमध्ये रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला असला तरी त्याने मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने षटकार ठोकताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्माने हा विक्रम केला.

रोहित शर्मा आता आयसीसी वनडे स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाारा फलंदाज बनला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल पहिल्या स्थानी कायम होता, पण रोहित त्याच्याही पुढे गेला आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा यात समावेश आहे, या दोन्ही स्पर्धा ५० षटकांमध्ये खेळवल्या जातात. रोहित शर्माने आता आयसीसी वनडे स्पर्धेत ६५ षटकार पूर्ण केले आहेत. ख्रिस गेल ६४ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २६४ धावा केल्या. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ५० षटकं न खेळता सर्वबाद झाला. यानंतर टीम इंडियाचा शुबमन गिलसह रोहित शर्माने सलामीची जबाबदारी स्वीकारली. त्याने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला, तर नॅथन एलिसच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. यासह त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

तत्पूर्वी, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत होता तेव्हा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आला नाही. स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत ७३ धावांची खेळी केली, तर ॲलेक्स कॅरीनेही ५७ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. याचे कारण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने १० षटकांत ४८ धावांत तीन विकेट घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतले. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. कुलदीप यादव हा एकमेव गोलंदाज होता ज्याला एकही विकेट मिळाली नाही.