Rohit Sharma’s Captaincy Exit: भारताच्या क्रिकेट इतिहासात एखादी स्पर्धा जिंकून दाखवलेल्या कर्णधाराचे नेतृत्व पुढल्याच स्पर्धेत वा मालिकेत काढून घेतल्याचे उदाहरण रोहित शर्माच्या निमित्ताने प्रथमच पाहायला मिळाले. विशेष म्हणजे निर्णय घेणारा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हा मुंबईकरच. यापूर्वीही मुंबईकर ‘सिलेक्टर’ने धाडसी निर्णय घेतले असले, तरी भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारास सन्माननीय निवृत्ती घेण्याची संधी न देण्याचा निर्णय धाडसी की निष्ठूर ही चर्चा यापुढेही होत राहील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली याच वर्षी मार्च महिन्यात भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. गतवर्षी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेण्टी-२० विश्वचषकाचे अजिंक्यपद पटकवले होते. त्यानंतर त्याने आणि विराट कोहलीने ट्वेण्टी-२० मधून रीतसर निवृत्ती स्वीकारली. कसोटी क्रिकेटमधूनही तो निवृत्त झालाच आहे. या दोन्ही प्रारूपांपेक्षा एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अधिक यशस्वी आणि परिणामकारक ठरत होता. किंबहुना, विराटकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहितकडे आल्यानंतर भारताच्या विजयसातत्यात भरच पडली.

विराट कोहलीने भारतीय संघाला सर्वच फॉरमॅट्समध्ये आक्रमक चेहरा दिला. पण त्याच्यापेक्षा थोडा शांत आणि मुद्राभिनयात माफक असलेल्या रोहितने दोन आयसीसी स्पर्धा भारताला जिंकून दिल्या नि एका स्पर्धेत अंतिम फेरी गाठून दाखवली. यांतील एक स्पर्धा म्हणजे ट्वेण्टी-२० विश्वचषक, पण या प्रकारातून रोहितने निवृत्ती घेतली असल्यामुळे त्यातील रोहितच्या कारकीर्दीचा वा नेतृत्वाचा आढावा घेण्याची गरज उरत नाही. त्याच्या एकदिवसीय नेतृत्वाचा आढावा मात्र प्राप्त परिस्थितीत घ्यावाच लागेल.

लॉइड, पाँटिंग… नि रोहित!

तो घेण्यासाठी प्रथम अर्थातच आकडेवारीचा संदर्भ आवश्यक. एकदिवयी क्रिकेटमध्ये दोन संघांचा दाखला दिग्विजयी म्हणून दिला जातो. यांतील पहिला क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वातील १९७५ ते १९८५ या काळातला वेस्ट इंडीजचा संघ. दुसरा अर्थातच रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील २००२-१२ या काळातला ऑस्ट्रेलियन संघ. दोन्ही कर्णधारांनी सलग दोन वेळा विश्वचषक जिंकला, त्यामुळे दोन सर्वाधिक यशस्वी कर्णधार अशी त्यांची ओळख. पण तेवढा एकच निकष नाही. दोन्ही कर्णधारांचे विजय-पराजय गुणोत्तरही इतर बहुतेक कर्णधारांपेक्षा उजवे आहे. हे गुणोत्तर म्हणजे पराभवापेक्षा किती पट अधिक विजय एखाद्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली त्या संघाने संपादले याचे प्रमाण. लॉइडच्या यांच्या बाबतीत हे गुणोत्तर ३.५५५ (६४ विजय, १८ पराभव, १ बरोबरी, १ रद्द) असे आहे. रिकी पाँटिंगच्या बाबतीत हे गुणोत्तर ३.२३५ (१६५ विजय, ५१ पराभव, २ बरोबरी, १२ रद्द) इतके आहे. या दोन महान कर्णधारांच्या मधोमध रोहितची आकडेवारी आहे!

रोहितने २०१७ ते २०२५ या काळात ५६ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्याचे गुणोत्तर ३.५०० (४२ विजय, १२ पराभव, १ बरोबरी, १ रद्द) इतके घसघशीत आहे. हे निकष लावताना किमान ५० सामन्यांमध्ये नेतृत्व करणे गृहित धरले आहे. लॉइड (८४) आणि पाँटिंग (२३०) यांनी रोहितपेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व केले हे मान्य. पण रोहितला विराट आणि महेंद्रसिंग धोनीच्या सावटाखाली नि मागेपुढे ही संधी मिळाली हेही लक्षात घ्यावे लागेल.

उत्तम सरासरी, खणखणीत स्ट्राइक-रेट

धोनीचे विजय-पराजय गुणोत्तर १.४८६ इतके, तर विराटचे गुणोत्तर २.४०७ इतके आहे. दोघांनी रोहितपेक्षा अधिक सामन्यांमध्ये (धोनी २००, विराट ९५) नेतृत्व केले ही बाब मान्य केली, तरी आणखी काही निकषांवरही रोहितचे नेतृत्व तेजाने तळपते याचीही दखल घ्यावी लागेल. या ५६ सामन्यांमध्ये रोहितची फलंदाजी सरासरी होती ५२.२० आणि स्ट्राइक रेट होता १११.९७. केवळ तीनच कर्णधारांनी (विराट, धोनी, एबी डेविलियर्स) रोहितपेक्षा अधिक सरासरी आणि केवळ एकाच कर्णधाराने (ब्रेंडन मॅककलम) त्याच्यापेक्षा अधिक स्ट्राइक रेट नोंदवला. पण या चौघांपेक्षा कितीतरी सरस कर्णधार रोहितचे जय-पराजय गुणोत्तर राहिले. आता मुद्दा येतो आयसीसी जेतेपदांचा. यात भारतीय कर्णधारांमध्ये धोनी अर्थातच सर्वांत उजवा. एक ट्वेण्टी-२० विश्वचषक (२००७), एक ५० षटकांचा विश्वचषक (२०११) आणि एक चँपियन्स करंडक (२०१३) ही त्याची कमाई. विराट कोहलीची पाटी केवळ या निकषावर कोरीच. पण रोहित शर्माने याही आघाडीवर दखलपात्र कामगिरी करून दाखवली. एक ट्वेण्टी-२० (२०२४) आणि एक चँपियन्स ट्रॉफी (२०२५). या जोडीला एक विश्वचषर उपविजेतेपद (२०२३). भारतातील त्या विश्वचषक स्पर्धेत हातातोंडाशी आलेले अजिंक्यपद भारताने गमावले. ते मिळते, तर कर्णधार रोहित शर्माची कारकीर्द अधिकच झळाळली असती.

हिंमत आणि दानत

या साऱ्यांत आणखी एका बाबीची दखल घ्यावी लागेल. रोहित हा बहुतेक काळ सलामीला येऊन खेळला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन योग्य वेळी प्रतिहल्ला चढवताना विकेट राखण्याचे भानही त्याला राखावे लागायचे. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये मोक्याच्या स्पर्धेत प्रसंगी स्वतःची विकेट पणाला लावून त्याने निःस्वार्थी आणि आक्रमक फटकेबाजी केली. त्याचे हे डावपेच केवळ आणि केवळ एकाच सामन्यात फसले आणि त्याच्या दुर्दैवाने तो विश्वचषकाचा अंतिम सामना ठरला. पण असे धोके पत्करून, प्रसंगी स्वतःच्या सरासरीची किंवा आकडेवारीची परवा न करता केवळ संघहित डोळ्यासमोर ठेवून ‘लीडिंग फ्रॉम फ्रंट’चा आदर्श रोहितने घालून दिला. लॉइड, पाँटिंग, धोनी, विराट यांच्यापैकी कोणीही सलामीवीर नव्हते. रोहितसमोर ते आव्हान सतत होते… खेळपट्टी प्रतिकूल असेल, तर चांगली सुरुवात करून देण्याचे, नि अनुकूल असेल तर आक्रमक सुरुवात करून देण्याचे.

म्हणूनच सन्माननीय निरोपास पात्र

ही सगळी पार्श्वभूमी पाहता, त्याच्याकडील कर्णधारपदच काढून घेण्याचा निर्णय काहीसा निष्ठूर ठरतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट यशस्वी झाले कारण तेथे भावनेला स्थान नाही वगैरे दावे कुचकामी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अलीकडच्या प्रत्येक यशस्वी कर्णधारास शेवटची मालिका वा सामना ठरवून रीतसर मानवंदना देऊन निरोप दिला गेला. रोहितच्या बाबतीत बीसीसीआय आणि निवड समितीला ती संधी होती. तीन सामन्यांच्या ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर तुला पर्याय आम्ही शोधून ठेवला आहे. २०२७मधील विश्वचषकासाठी शुभमन गिलवर आतापासूनच धुरा सोपवणे आवश्यक आहे वगैरे बाबी त्यास समजावून सांगता असत्या आणि रोहितला त्या पटल्याही असत्या. हल्ली एकदिवसीय क्रिकेट फारसे खेळले जात नाही नि ‘ऐन वेळी’ विश्वचषकासाठी कर्णधार शोधणे अव्यवहार्य ठरेल, अशी मीमांसा आगरकरने केली. हा विलंब केवळ तीन सामन्यांनी वाढला असता ही बाब बुद्धीला न पटणारी आहे. तीन सामन्यांच्या अखेरीस रोहितला सन्मानाने निवृत्ती जाहीर करता आली असती. त्याऐवजी आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर पुढच्याच सामन्यात नेतृत्व गमावलेला कर्णधार हा डाग त्याला आयुष्यभर वागवावा लागेल. रोहितला अशी वागणूक देणे भारताच्या क्रिकेट व्यवस्थेला शोभत नाही.

siddharth.khandekar@expressindia.com