भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा आज सामना खेळला जात आहे (IND vs BAN). या सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली आहे. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला दुखापत झाली. रोहितच्या दुखापतीनंतर त्याला एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. मालिकेत पिछाडीवर असलेल्या टीम इंडिया मिरपूरमधील हा सामना जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने डावाच्या दुसऱ्या षटकात अनामूल हकला अवघ्या ११ धावांवर पायचित केले.

विशेष म्हणजे पहिल्या वनडेत टीम इंडियाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. बॅटिंग युनिट पूर्णपणे अपयशी असल्याचे दिसून आले. तसेच अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता टीम इंडिया त्यांच्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याने माजी कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, एकाही भारतीयाचा समावेश नाही

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाने १४ षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद ५७ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून शानदार गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमरान मलिकने देखील एक विकेट घेतली आहे.