भारतीय संघातील दोन प्रतिभावंत फलंदाज म्हणून कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांना ओळखले जाते. हे दोघे वरच्या फळीत भारताच्या फलंदाजीला बळ देतात. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये हे दोघे क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोघांच्या खेळीची कायम तुलना केली जाते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅ़ड हॉग याने ट्विटरवर प्रश्नोत्तराचे सत्र घेतले. त्यात त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातच त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये रोहित आणि विराट यांच्यात चांगला फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे त्याने कारणासहित उत्तर दिले.

ब्रॅड हॉग

“मर्यादित षटकांचा प्रश्न आला तर त्यात मला असं वाटतं की विराट कोहली हा जास्त चांगला फलंदाज आहे. आव्हानांचा पाठलाग करण्याची जेव्हा टीम इंडियावर जेव्हा वेळ येते, तेव्हा विराटच्या कामगिरीत सातत्य असतं. तो सातत्याने चांगली खेळी करून दाखवतो. टीम इंडियाला जेव्हा प्रतिस्पर्धी संघाकडून आव्हान दिलं जातं, तेव्हा तो मैदानात पाय रोवून उभा राहतो आणि दमदार खेळ करून दाखवतो. पण तसे असले तरी तुम्ही त्या दोघांच्या खेळीची तुलना करणे चुकीचे आहे कारण त्या दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. नव्या चेंडूविरूद्ध आक्रमक खेळ करून फिल्डरच्या डोक्यावरून धावा जमवणे हे रोहितचे काम असते. तर डावाच्या शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून राहणे आणि मोक्याच्या क्षणी दमदार खेळी करून समोरच्या गोलंदाजावर हल्लाबोल चढवणे हे विराटचे काम आहे”, असे हॉगने स्पष्टीकरण दिले.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली धावांचा पाठलाग करण्यात सर्वोत्तम फलंदाज आहे, असे कौतुकोद्गार ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने काढले होते. ‘‘कोहली हा विलक्षण खेळाडू आहे. तो तंदुरुस्त असून ताकदवान आहे. क्रिकेटसाठी हे दोन्ही गुण महत्त्वाचे असतात. पांढऱ्या चेंडूने खेळण्यात येणाऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करण्यात कोहली सर्वोत्तम आहे,’’ अशी स्तुती स्मिथने केली.