Rohit Sharma Video With Kapil dev Dhoni Viral: भारताचा सर्वांचा लाडका फलंदाज आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण हिटमॅन सोशल मीडिया पोस्ट आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत चाहत्यांच्या संपर्कात कायम आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेत हिटमॅनला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. दरम्यान रोहित शर्माचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमधील रोहित शर्माच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
रोहित शर्मा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. आयपीएल २०२५मध्ये रोहित शर्मा अखेरचा क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता. तर भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रोहित अखेरचा खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी रोहित शर्माने कमालीचा फिटनेस मिळवला आहे. रोहितच्या फिटनेसची चर्चा एकदम जोरदार होती.
रोहित शर्माने त्याचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू, कोच अभिषेक नायरसह १० किलो वजन कमी केलं आहे. या नव्या लूकमध्ये रोहित शर्मा प्रचंड फिट आणि कमाल दिसतो आहे. रोहित शर्माच्या या नव्या लूकचं सर्वजण कौतुक करत आहे. यादरम्यान रोहित नुकत्याच एका कार्यक्रमाला उपस्थित होता. तिथे भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि एम एस धोनीही होते.
रोहित शर्मा, कपिल देव, धोनीचा व्हीडिओ पाहिलात का?
कोलकातामध्ये झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटन समारंभासाठी तिन्ही दिग्गज खेळाडू उपस्थित होते. यादरम्यान रिबिन कापण्यासाठी कपिल देव मागे असलेल्या रोहित शर्माला पुढे बोलावून त्याला खेचत होते. पण रोहितने मात्र त्यांचा मान राखत तुम्ही रिबिन कापा असं म्हणत तो काही पुढे आला नाही. शेवटपर्यंत काही कपिल देव यांचं रोहित ऐकला नाही. कपिल देव रोहितचा हात खेचत त्याला पुढे आणत होते. पण ऐकेल तो रोहित कसला.
रोहितने यानंतर कपिल देव यांना पुढे केलं. तर कपिल देव यांनी रोहितचा हात धरत त्यालाही सोबत उभं केलं. पण नंतर रोहितने आपला हात मागे घेत धोनीचा हात रिबिन कापण्यासाठी पुढे केला आणि मागून या दोघांच्या हाताला हात लावला. यानंतर त्या सुंदर जागेचं उद्घाटन करण्यात आलं.
रोहितच्या या व्हीडिओसह कपिल देव, धोनी आणि हिटमॅन यांच्या मुलाखतीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान रोहित शर्माच्या टीमने रोहितच्या प्रवासाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याचा मुंबई ते कोलकाता प्रवास दाखवला आहे. या व्हीडिओत रोहित बंगाली भाषा बोलतानाही दिसत आहे.