नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत भारताने ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत भारतीय कसोटी संघाला नवा हिरा गवसला आहे. मुंबईकर सर्फराझ खानने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या मालिकेतून रजत पाटिदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप या खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं. पदार्पणाच्या मालिकेत हे खेळाडू रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळले. सर्फराझ खानच्या पदार्पणावेळी रोहित शर्मा आणि सर्फराझचे वडील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी मैदानावर नेमकं काय घडलं याबाबत रोहितनेदेखील त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित म्हणाला, सर्फराझ आणि आकाश दीपला डेब्यू कॅप (पदार्पणाच्या वेळी दिली जाणारी भारतीय संघाची टोपी) देताना मी भावूक झालो होतो.

रोहित म्हणाला, या नव्या मुलांबरोबर खेळताना मजा आली. ते खूप उत्साही आहेत. त्यांच्याबरोबर खेळणं माझ्यासाठी सोपं होतं कारण मी या सगळ्यांना आधीपासूनच ओळखत होतो. मला त्यांचा खेळ, त्यांची ताकद माहिती होती. त्यांच्याशी चांगलं बोलणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हीच माझी जबाबदारी होती. त्यासाठी मी या खेळाडूंनी आधी जी चांगली कामगिरी केली आहे त्याची आठवण करून दिली. दबावाला जुमानू नका असा संदेशही दिला.

मी आणि राहुल द्रविड (प्रशिक्षक) या नव्या खेळाडूंशी नेहमी बोलायचो. त्यांच्याकडूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत होता. आमच्या लक्षात आलं होतं की ही मुलं आव्हानांसाठी तयार आहेत. आम्हाला संघात खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं होतं. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न मी आणि राहुल करत होतो.

हे ही वाचा >> क्रिकेट सर्व काही नसल्याची धोनीला पूर्वीच जाणीव- झहीर

राजकोट कसोटीपूर्वी रोहितने सर्फराझ खानला त्याची पदार्पणाची कसोटी कॅप दिली. त्यानंतर रोहितने सर्फराझचे वडील नौशाद खान यांच्याशी दोन मिनिटे बातचीत केली होती. त्यावेळी रोहित आणि नौशाद खान यांच्यात काय बोलणं झालं याचा रोहितने खुलासा केला आहे. रोहित म्हणाला, मी कांगा लीगमध्ये सर्फराजच्या वडिलांबरोबर खेळलो आहे. तेव्हा मी खूप लहान होतो. त्याचे वडील डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करायचे. मुंबई क्रिकेटमध्ये त्यांचं नाव लोकांच्या परिचयाचं होतं. इतक्या वर्षांच्या त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं आहे. त्यामुळे मला त्यांचं कौतुक करायचं होतं. मी त्यांना म्हणालो, ये टेस्ट कॅप जितना उसका हैं, उससे ज्यादा आपका हैं (ही टेस्ट कॅप जितकी त्याची आहे, त्यापेक्षा जास्त तुमची आहे)