Rohit Sharma Six Hits On His Lamborghini: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. टी-२० मालिकेसाठी क्रिकेट चाहते तितके उस्तुक नाहीत. पण क्रिकेट चाहते वनडे मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण ८ महिन्यांनंतर विराट आणि रोहितची जोडी मैदानात उतरणार आहे. या मालिकेआधी विराट कोहली लंडनमध्ये आहे. तर रोहित शर्मा दादरच्या शिवाजी पार्कात सराव करताना दिसून आला आहे. त्याचा सराव करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या मैदानावर सराव करणं त्याला महागात पडलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
रोहित शर्मा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सराव करण्यासाठी येणार, ही माहिती मिळताच चाहत्यांनी सराव पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. रोहितनेही मोठे फटके मारून चाहत्यांचं मनोरंजन केलं. यादरम्यान एक फटका त्याने इतका जोरदार मारला, की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर जाऊन पडला. रोहितने स्लॉग स्वीप शॉट मारला,जो मैदानाबाहेर पार्क केलेल्या त्याच्या लॅम्बॉर्गिनीवर जाऊन पडला. या शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही ऐकू शकता, एक फॅन म्हणतो, “फुटली गाडी… स्वत:ची गाडी फोडली.”
वनडे संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी रोहितसाठी ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे रोहित कसून सराव करताना दिसून आला. रोहितने अभिषेक नायरसोबत मिळून २ तास सराव केला. याआधी अभिषेक नायरने भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. आता तो रोहितला सरावात मदत करत आहे. यासह फिटनेसमध्येही त्याने रोहितची मदत केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितने तब्बल १० किलो वजन कमी केलं आहे.
हा सराव त्याने दादरच्या ऑल हार्ट क्रिकेट अॅकेडमीच्या नेट्समध्ये केला. त्यावेळी अंगकृष रघुवंशी आणि मुंबईतील स्थानिक खेळाडू देखील उपस्थित होते. याआधी रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. आता ८ महिन्यांनंतर हिटमॅन मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.