टी-२० विश्वचषक २०२४ हा भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोचच्या भूमिकेतील अखेरची टूर्नामेंट असणार आहे. यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाला आयसीसीचे जेतेपद मिळवता आले नसले तरी संघाची झालेली प्रगती ही तितकीच महत्त्वाची आहे. द्रविड यांनी सोमवारी स्पष्ट केले की, टी-२० विश्वचषक ही त्याचीप्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबतची शेवटची स्पर्धा असेल. एका दिवसानंतर, द्रविड यांच्या प्रशिक्षक म्हणून अखेरच्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा भावुक झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी सांगितले की, रोहितने द्रविड यांना भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची विनंती केली होती.

रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची आठवण करून देताना सांगितले की, त्याने राहुलच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो म्हणाला, “मी जेव्हा आयर्लंडविरूद्ध पदार्पण केले तेव्हा द्रविड माझे पहिले आंतरराष्ट्रीय कर्णधार होते. जेव्हा मी कसोटी सामन्यांसाठी संघात आलो तेव्हा मी त्यांना जवळून खेळताना पाहिले. ते आपल्या सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहेत.”

“लहानपणापासूनच त्यांना खेळताना पाहिले आहे आणि आपल्याला माहित आहे की त्यांनी एक खेळाडू म्हणून वैयक्तिक पातळीवर किती यश मिळवले आहे आणि कित्येक वर्ष संघासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. संघ कठीण परस्थितीत असताना संघाला त्यातून बाहेर काढण्याचे कौशल्य त्यांच्यात होते.

द्रविड यांनी आयर्लंडच्या सामन्यापूर्वी जाहीर केले की, यंदाचा वर्ल्डकप ही त्यांचा भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून अखेरची टूर्नामेंच असेल. याबाबत बोलताना रोहित भावूक झाला. “मी त्यांना प्रशिक्षकपदी कामय राहावे हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण साहजिकच इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांची त्यांना काळजी घेणे आवश्यक आहे. पण हो, मी वैयक्तिकरित्या त्यांच्यासोबतचा माझा वेळ एन्जॉय केला आहे. मला खात्री आहे की बाकीचे सगळेही तेच म्हणतील. त्यांच्यासोबत काम करणं हा खूप चांगला अनुभव होता आणि मी यावर अजून काहीही बोलू शकणार नाही. असे म्हणत रोहित थांबला.

पुढे रोहित म्हणाला, “द्रविड जेव्हा प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाले तेव्हा मला त्यांच्याकडून खूप शिकायचे होते. जे खूप फलदायी ठरले आहे. मोठ्या ट्रॉफींव्यतिरिक्त, आम्ही सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिका जिंकल्या. त्याच्यासोबत काम करताना मी सर्व गोष्टींचा आनंद घेतला आहे. संघाला कोणत्या दिशेने, कशी कामगिरी करणार हे आम्ही ठरवले.” द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये संघाची जबाबदारी स्वीकारली.

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. मात्र, गंभीरने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. बीसीसीआयनेही गंभीरच्या अर्जावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने नुकतीच आयपीएल ट्रॉफी जिंकली. गंभीर दोन वेळा जगज्जेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.