Rohit Sharma to be Remove from Test Captaincy by selectors: रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२५ नंतर, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची कमान रोहितच्या हातात नसून नवीन कर्णधाराच्या हातात असेल. टीम इंडियाला पुढील महिन्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही मोठी माहिती देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून काढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे अहवालातून समोर आले आहे. एवढेच नाही तर निवड समितीच्या या निर्णयाला बीसीसीआय देखील पाठिंबा देणार आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात खुलासा केला आहे की, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अखेर रोहितला आता कसोटी संघाचा कर्णधार म्हणून न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या जेतेपदानंतर रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये रोहित संघाचा कर्णधार होता. पण फरक फॉरमॅटमध्ये आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफी ही एकदिवसीय फॉरमॅटची स्पर्धा आहे, वनडे फॉरमॅटमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील गेल्या काही महिन्यांचा काळ भारतीय संघासाठी खूप वाईट होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील यशानंतर रोहितने इंग्लंड दौऱ्यावर नेतृत्व करावे, अशी बोर्डाची इच्छा असल्याचे एक्सप्रेसने मार्चमध्ये वृत्त दिले होते. रोहितनेही मायकेल क्लार्कच्या ‘बियाँड २३’ या पॉडकास्टमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्याबरोबर इंग्लंडमध्ये संघाचे नेतृत्व करण्याबद्दल उत्साही असल्याचे म्हटले होते. निवडकर्त्यांनी गेल्या महिन्यात भारतीय कसोटी संघातील रोहितच्या भविष्याबद्दल बरीच चर्चा केली आणि मंगळवारी मुंबईत या मुद्द्यावर चर्चा केली गेली, त्यानंतर बीसीसीआयसमोर आपलं मत मांडलं.

“निवडकर्त्यांची मत अगदी स्पष्ट आहे, त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन कर्णधार हवा आहे आणि रोहितचा कसोटीमधील फॉर्म पाहता रोहित कर्णधार म्हणून त्यांच्या प्लॅन्समध्ये नीट बसत नाहीये. त्यांना पुढील कसोटी मालिकेसाठी एका युवा कर्णधाराची निवड करायची आहे आणि निवड समितीने बीसीसीआयला कळवले आहे की रोहित संघाचे नेतृत्व करणार नाही,” असे भारतीय बोर्डातील एका सूत्राने या वृत्तपत्राला इंडियन एक्सप्रेसने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील परिस्थितीची पुनरावृत्ती इंग्लंड दौऱ्यावर होऊ नये, असं निवड समितीचं म्हणणं आहे. रोहित त्या मालिकेत धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता, पाच डावांमध्ये त्याची सरासरी फक्त ६.२० होती आणि त्याने शेवटच्या कसोटीसाठी स्वतःला सामन्याबाहेर ठेवले होते. त्याआधीच्या कसोटी मालिकेत, गेल्या वर्षीच्या अखेरीस मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध, त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये फक्त १५.१६ सरासरीने धावा केल्या होत्या.

रोहित शर्माचा कसोटीमधील फॉर्म पाहता त्याला पुन्हा संघाचा कर्णधार करण्याचा निवड समितीचा विचार नाहीये. एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून, कामगिरी चांगली झाली नाही तर त्याला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते, परंतु जर तो कर्णधार असेल तर परिस्थिती गुंतागुंतीची होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे त्याचा संघावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.