फुटबॉल सामन्यात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये थोडीशी हाणामारी आणि शाब्दिक चकमक बऱ्याचदा बघायला मिळते. मात्र रविवारी (२७ नोव्हेंबर) रशियन चषकाच्या सामन्यादरम्यान घडलेल्या फुटबॉल जगताला लाजवेल अशी घटना घडली आहे. क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर झेनिट सेंट पीटर्सबर्ग आणि स्पार्टक मॉस्को यांच्यातील सामन्यादरम्यान ही संपूर्ण घटना घडली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी खेळ भावना बाजूला ठेवून जोरदार हाणामारी केली.

सामन्याच्या दुखापती वेळेत (९०+ मिनिटे) संपूर्ण वाद सुरू झाला. स्पार्टक मॉस्को फ्री-किक घेत असताना, संघाचा फॉरवर्ड क्विन्सी प्रोम्स आणि जेनिट सेंट पीटर्सबर्ग मिडफिल्डर विल्मर बॅरिओस यांचे खांदे एकमेकाला धडकले. त्यानंतर दोघांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाली. मग काय, दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हाणामारीसाठी जमले.

झेनिट सेंट पीटर्सबर्गच्या रॉड्रिगो प्राडोने रेफ्रीसमोर स्पार्टकच्या खेळाडूंना लाथा मारताना दिसले. यासोबतच स्पार्टकचा बदली खेळाडू अलेक्झांडर सोबोलेव्हही बॉक्सिंगचा सामना असल्याचे समजून अॅक्शनमध्ये उतरला. याशिवाय उर्वरित खेळाडूंचीही अशीच अवस्था होती. रशियन ब्रॉडकास्टर मॅच टीव्हीच्या या वादाशी संबंधित फुटेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच आतापर्यंत लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे.

रेफ्रींनी ६ खेळाडूंना दाखवले रेड कार्ड –

रेफ्री व्लादिमीर मोस्कालेव्ह यांनी सुरुवातीला प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्या. त्यामुळे दोन्ही संघातील प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश असलेल्या एकूण सहा खेळाडूंना रेफ्रींनी रेड कार्ड दाखवले. यजमान झेनिट सेंट पीटर्सबर्गसाठी माल्कम, बॅरिओस आणि रॉड्रिगो यांनी रेड कार्ड दाखवले, तर स्पार्टकचे अलेक्झांडर सोबोलेव्ह, शामर निकोल्सन आणि अलेक्झांडर सेलिखोव्ह यांना रेड कार्ड दाखवण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले ते बेंचवर होते आणि घटनेच्या वेळी ते सामन्याचा सक्रिय भाग नव्हते.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: “मला विश्वास आहे की…”, ब्राझीलच्या प्रशिक्षकांचे नेमारच्या दुखापतीवर केले मोठे विधान

झेनिट सेंट पीटर्सबर्गने शूटआऊटमध्ये मिळवला विजय –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर हे नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेले, जेथे यजमान संघ झेनिट सेंट पीटर्सबर्गने ४-२ ने सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही संघांकडे पेनल्टी शूटआऊटसाठी पुरेसे खेळाडू होते. सामन्याचा निकाल कदाचित पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला असेल, पण जो तमाशा पाहिला गेला तो खरोखरच निराशाजनक होता.