Ruturaj Gaikwad broke Virat Kohli’s and KL Rahul Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या मैदानावर पार पडला. या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव करत मालिकाही जिंकली. आतापर्यंत या मालिकेत भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची फलंदाजी शानदार राहिली आहे. ऋतुराज गायकवाडने चार डावात ७१ च्या सरासरीने २१३ धावा केल्या आहेत. ऋतुराजने चौथ्या टी-२० सामन्यात ३१ धावांच्या खेळी जोरावर एक मोठा पराक्रम केला ज्यामध्ये त्याने विराट कोहली आणि केएल राहुलचे वैयक्तिक विक्रम मोडले आणि त्यांना मागे टाकले आहे.
ऋतुराज गायकवाडने विराट-राहुलला टाकले मागे –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याही द्विपक्षीय टी-२० मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता रुतुराज गायकवाडच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने १९९ धावा केल्या होत्या. ऋतुराजने या टी-२० मालिकेत शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे, ज्याने २१८ धावा केल्या आहेत. मालिकेतील शेवटच्या टी-२० सामन्यातही आता ऋतुराजला हा विक्रम मोडण्याची संधी असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत पार केला हा टप्पा –
याशिवाय रुतुराज गायकवाडने टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पाही पार केला. यासाठी त्याने ११६ डावा घेतले. तो आता सर्वात कमी डावात हा आकडा गाठणारा भारताचा खेळाडू बनला आहे. गायकवाडच्या आधी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता, ज्याने ११७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
हेही वाचा – Team India : भारताने पाकिस्तानला मागे टाकत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
ऋतुराजला विराट-राहुलचा विक्रम मोडण्याची संधी –
द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. भारताच्या माजी कर्णधाराने २०२१ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान एकूण २३१ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने २०२० मध्ये द्विपक्षीय स्पर्धेदरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांमध्ये २२४ धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराजने चार डावात २१८ धावा केल्या आहेत. तो विराट आणि राहुलचा विक्रम पुढच्या डावात मोडू शकतो.
रिंकू सिंगने दाखवली आपल्या बॅटची जादू –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर त्यात रिंकू सिंगने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. रिंकूने २९ चेंडूत ४६ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय जितेश शर्माने १९ चेंडूत ३५ धावा करत २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला १५४ धावांवर गारद २० धावांनी विजय नोंदवला.