Ruturaj Gaikwad Replaces MS Dhoni As CSK Captain in IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी मोठी घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएल सुरू झाल्यापासून सीएसके आणि महेंद्रसिंह धोनी असे एक समीकरण राहिले आहे. २०२२ च्या हंगामात काही काळ रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र पुन्हा महेंद्रसिंह धोनीने स्वतःकडे जबाबदारी घेतली. या हंगामाच्या सुरुवातीलाच चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आली आहे. सीएसकेचा पहिला सामना शुक्रवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंज बंगळुरूशी होणार आहे. तत्पूर्वी ऋतुराज गायकवाडने कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.
CSK New Captain: मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार
काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?
“नव्या जबाबदारीचा मला मनापासून आनंद वाटतोय. ही खरंच मोठी जबाबदारी आहे. पण आमच्या संघात ज्या पद्धतीचे खेळाडू आहेत, त्यावरून मी निश्चिंत आहे. इथे प्रत्येकजण अनुभवी आहे. शिवाय माझ्याकडे माहीभाई (महेंद्रसिंह धोनी), जड्डू भाई (रवींद्र जडेजा) आणि अज्जू भाई (अजिंक्य रहाणे) आहेत. या तिघांनीही कर्णधारपदाची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी फार चिंतेचा विषय नाही”, अशी प्रतिक्रिया सीएसकेच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे ऋतुराजने दिली.
चेन्नई सुपर किंग्जच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी नव्या खेळाडूंना तयार करण्याचा संघाचा दृष्टीकोन असल्याचे सांगितले जाते. याआधी २०२२ साली धोनीने कर्णधारपदाची धुरा रवींद्र जडेजाच्या हातात दिली होती. मात्र हा निर्णय सीएसके संघावरच उलटला होता. त्यानंतर हंगामाच्या मध्यातूनच रवींद्र जडेजाने माघार घेतली आणि धोनीने पुन्हा संघाची कमान आपल्या हाती घेतली होती.
२०२३ च्या हंगामात सीएसकेने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला संघात सहभागी करून कर्णधारपदासाठी पर्याय म्हणून पाहिले होते. पण स्टोक्सच्या फिटनेसच्या समस्या पाहता सीएसके संघाने आपले लक्ष ऋतुराजकडे वळविले आहे. २७ वर्षीय ऋतुराज गायकवाड भारतीय संघासाठी फार अधिक खेळलेला नाही. मात्र सीएसकेसाठी सलामीचा फलंदाज म्हणून त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे.
ऋतुराजने २०१९ साली सीएसके संघात सहभागी झाला होता, तर २०२० साली त्याला खेळण्याची संधी मिळाली. २०२० च्या हंगामात लागोपाट तीन सामन्यात ऋतुराजने सामनावीर होण्याचा बहुमान पटकविला होता. २०२१ साली जेव्हा सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले, त्या हंगामात ऋतुराजने ऑरेंज कॅप जिंकली होती. तेव्हापासून सीएसके संघात तो कायम खेळत आला आहे.