Sachin Tendulkar Visits Lalbaug Cha Raja: देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. पण मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष जरा जास्त आहे. केवळ भारतातून नव्हे, तर परदेशातूनही भाविक मुंबईत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांसह मोठमोठे सेलिब्रिटीही हजेरी लावत असतात. दरम्यान गुरूवारी रात्री मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी सर्वांची नजर अर्जुन तेंडुलकरवर होती. कारण काही दिवसांपूर्वीच अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे सानिया अर्जुनसोबत येणार अशी चर्चा होती. पण असं झालं नाही. सचिनसह पत्ती अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना दिसून आले.
याआधी सचिन, अंजली आणि अर्जुन तेंडुलकर हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देखील गेले होते. त्यावेळी देखील तेंडुलकर कुटुंबाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. सानियासोबत साखरपुडा झाल्यानंतर अर्जुनची माध्यमांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. पण यावेळीही सानिया त्याच्यासोबत नव्हती.
अर्जुनबाबत बोलताना सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाल्याची बातमी १३ ऑगस्टला समोर आली होती. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेंडुलकर कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिनने रेडिटच्या आस्क मी अॅनिथिंग या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
या चर्चेदरम्यान त्याला अर्जुनच्या साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला होता की,” हो, त्याने साखरपुडा केला आहे. आम्ही सर्वजण त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी खूप उत्सुक आहोत.” सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना आमंत्रण देण्यात आलं होतं.