Ind vs Eng Test 2025 Series: रोहित शर्मा व विराट कोहलीशिवाय पहिल्यांदाच भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या नव्या फळीच्या शिलेदारांचा कस लागण्याची शक्यता आहे. शुबमन गिलकडे कसोटी संघाचं नेतृत्व आहे. भारताच्या यंग ब्रिगेडची कामगिरी कशी होईल, याकडे तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतानाच या मालिकेत भारताचा हुकमी एक्का म्हणजेच भरवशाचा आणि अनुभवी बुमराह हे मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यात आहे. भारतासह जगभरात बुमराहचे चाहते आहेत. या मालिकेत बुमराहनं नेमकं काय करायला हवं, यासंदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याला कानमंत्र दिला आहे.
जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून दुखापतींनी ग्रस्त असून त्यामुळे त्याला यादरम्यानच्या काही सामन्यांना मुकावंही लागलं होतं. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये बुमराहनं पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं दाखवलं असलं, तरी आयपीएलमधून थेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दाखल झाल्यामुळे बुमराहसह सगळ्यांच्याच कामगिरीकडे लक्ष असेल. अर्थात, बुमराहचा अनुभव या सर्व निकषांच्या पलीकडचा असून त्याच्या याच वलयाचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूही उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकर हे त्यातलंच एक नाव!
सचिन तेंडुलकरनं बुमराहला काय दिला कानमंत्र?
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरीबाबत आणि यंग ब्रिगेडच्या खेळण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. मात्र, त्याचवेळी सचिनलाही बुमराहची तेजतर्रार आणि फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी बघण्याची उत्सुकता आहे. या मुलाखतीमध्ये सचिननं ती व्यक्तदेखील केली असून बुमराहला इंग्लंडमधील खेळपट्ट्या व वातावरणात कशा प्रकारे प्रभावी गोलंदाजी करता येईल, याबाबत कानमंत्र दिला आहे.
“कसोटी सामन्याच्या पहिल्या तासाभरात बुमराह गोलंदाजी करताना फक्त स्टम्प्सवर मारा करू शकतो का हे मला बघायचं आहे. त्यामुळे गोलंदाजांना त्याचे चेंडू सोडणं अशक्य होईल. कारण माझ्या अंदाजानुसार, इंग्लंडचे फलंदाज बुमराहला काळजीपूर्वकच खेळतील. त्याच्या गोलंदाजीवर कोणतीही जोखीम घेण्याची चूक ते करणार नाहीत. त्यामुळे बुमराहनं फक्त स्टम्प्सवर मारा करायला हवा. जर फलंदाजांनी त्याचे चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, तर तिथे विकेट्स मिळण्याची शक्यता आहे”, असं सचिन तेंडुलकर या मुलाखतीत म्हणाला.
स्टुअर्ट ब्रॉडनं सांगितली बुमराहच्या गोलंदाजीची ‘ही’ युक्ती!
दरम्यान, नुकताच निवृत्त झालेला इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं त्याचा एकेकाळचा सहकारी जोस बटलरशी बोलताना बुमराहच्या गोलंदाजीतील महत्त्वाची बाब अधोरेखित केली आहे. “बुमराह गोलंदाजी करताना कधीच एकाच जागेवरून चेंडू फेकत नाही. क्रीजच्या आत तो अर्धा फूट किंवा कधीकधी एक फूट जागा बदलत असतो. चेंडू टाकण्यासाठी धावत आल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी पाय टाकताना होणारा हा बदल आणि चेंडू हातातून सोडताना त्याच्या खांद्याची किंवा मनगटाची बदलणारी हालचाल यामुळे नेमका त्याचा चेंडू कोणथ्या दिशेनं येणार आहे याचा अंदाज लावणं कठीण होऊन जातं”, असं ब्रॉड म्हणाला आहे.
Ind vs Eng कसोटी सामने कधी व कुठे होणार?
पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन