Sai Sudharsan Stunning Catch Ball Hits on Hand Video: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात साई सुदर्शनने एक कमालीचा झेल टिपला. भारताने शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल यांनी शतकी खेळी केल्या. तर साई सुदर्शनचं शतक मात्र हुकलं. याशिवाय ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी यांनी झटपट धावा केल्याने भारताने ५०० अधिक धावा करत डाव घोषित केला.
भारताच्या टॉप फलंदाजी फळीने दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ५१८ धावा करत डाव घोषित केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने १७५ धावांची तर शुबमन गिलने १२९ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. भारताच्या सर्व फलंदाजी जोड्यांनी अर्धशतकी भागीदारी रचल्या. केएल राहुल ३८ धावा, साई सुदर्शन ८७ धावा, तर नितीशने ४३ आणि जुरेल ४४ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या.
साई सुदर्शनचा कॅच पाहून डोळ्यांवर विश्वास नाही बसणार
भारताने डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजने सावधतेने सुरूवात केली. जडेजा सामन्यातील आठवं षटक टाकण्यासाठी आला होता आणि त्याच्या षटकात फॉरवर्ड शॉर्ट लेगला साई सुदर्शनला तैनात केलं होतं. दुसऱ्या चेंडूवर जॉन कॅम्पबेल स्वीप शॉट खेळण्यासाठी गेला आणि तिथे साई सुदर्शन फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा होता. कॅम्पबेलने इतक्या जोरात फटका खेळला होता की तो साईच्या छाती, डावा हात आणि हेल्मेटच्या मध्ये लागला.
साईला चेंडूचा फटका बसूनही त्याने चेंडू लागून बाहेर येऊ दिला नाही आणि कमालीचा झेल टिपला. कॅम्पबेल हा झेल पाहून आश्चर्यचकित झाला. तितक्यात जुरेल धावत जाऊन विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसला. पण साईच्या हातावर चेंडू इतक्या वेगाने जाऊन बसला होता की तो वेदनेने कळवळताना दिसला. वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असताना शुबमन गिलने सेलिब्रेशन करणाऱ्या जुरेलला मागे केलं आणि तितक्यात फिजिओसह साई सुदर्शन मैदानाबाहेर गेला. साईने टिपलेला हा झेल पाहून सर्वच जण चकित झाले. याचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साई सुदर्शन या कमालीच्या झेलनंतर काही वेळासाठी मैदानाबाहेर गेला होता. हातावर जोरदार चेंडू आदळल्याचं रिप्लेमध्येही स्पष्ट दिसून आलं. साईच्या या चकित करणाऱ्या झेलसह भारताला ब्रेकथ्रू मिळाला. जडेजाने यासह सामन्यातील पहिली विकेट मिळवली.