‘खेळात आलेले शैथिल्य दूर करण्यासाठी हैदराबादहून बंगळुरूला विमल कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली सरावाचा निर्णय घेतला. मी जिंकू शकतो हा विश्वास त्यांनीच पुन्हा रुजवला. त्यांच्यामुळेच खेळातले बारकावे घोटीव करू शकले’, असे सायना नेहवालने सांगितले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेती सायना मायदेशी परतली. त्यावेळी ती बोलत होती.
दुखापती आणि खराब कामगिरीमुळे गेल्या वर्षी निवृत्तीचा विचार मनात डोकावला होता. मात्र विमल सर खंबीरपणे मागे उभे राहिले. त्यांच्या बोलण्यामुळेच गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळाला. त्यांच्या भक्कम आधारामुळेच निवृत्तीच्या विचारापासून दूर झाले आणि पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित करू शकले असे सायनाने सांगितले.  हैदराबादहून बंगळुरूला जाण्याचा निर्णय महत्त्वाचा होता. माणूस म्हणूनही मी अधिक परिपक्व झाले आहे. बंगळुरूत सराव करण्याच्या निर्णयानंतर मी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. चीन आणि इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. ऑल इंग्लंड आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. त्यामुळे तो निर्णय मी घेतला. विमल सरांचा या यशात मोलाचा वाटा आहे. माझ्या खेळासाठी वैयक्तिक लक्ष पुरवल्यानेच यशस्वी वाटचाल करू शकले. शारीरिकदृष्टय़ा मला अधिक तंदुरुस्त वाटते आहे. माझ्या खेळात ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी विमल सरांनी प्रचंड मेहनत घेतली. मी जिंकू शकते हा विश्वास सातत्याने दिला.
मनाजोगती कामगिरी होत नसल्याने गेल्या वर्षी निवृत्तीचा विचार केला होता. खराब प्रदर्शनामुळे मी माझ्यावरच वैतागले होते. चांगले खेळण्यासाठी स्वत:ला प्रेरित करणे कठीण झाले होते. मी जागतिक दर्जाची खेळाडू आहे याची जाणीव होती. पण संघर्ष न करताच मी सामने गमावत होते. त्यावेळी उबेर चषक स्पर्धेत महिला संघाला विमल सरांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हापासून मी विजयपथावर परतले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाविषयी विचारले असता सायना म्हणाली, ‘या पदकामुळे ऑलिम्पिकसाठी आत्मविश्वास मिळाला आहे. या स्पर्धेतील खेळाडूच ऑलिम्पिकमध्येही प्रतिस्पर्धी असणार आहेत. ऑलिम्पिक चार वर्षांनी होते. दडपण जास्त असते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी माझ्यासाठी अडथळा ठरली होती. यंदा ते ओझे डोक्यावरून उतरले. जेतेपद पटकावण्याचेच उद्दिष्ट समोर होते. कॅरोलिनविरुद्ध चांगले खेळण्याचा प्रयत्न केला. पण गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत. अंतिम सामन्यात पराभव निराशादायी होता. पण त्या टप्प्यापर्यंत मजल मारल्याचे समाधान आहे. देशाप्रती पदक जिंकल्याने आनंद झाला’.