Sajeevan Sajana hit a winning six off the last ball against Delhi Capitals : महिला प्रीमियर लीग २०२४ ची सुरुवात दमदार झाली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिला सामना अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही संघ गेल्या मोसमातील अंतिम फेरीचे स्पर्धक होते आणि फायनलप्रमाणेच रोमांचक सामना येथे पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबईला सजीवन सजनाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन चार विकेट्सनी विजय मिळवून दिला. त्याचबरोबर तिने जावेद मियांदादच्या ३८ वर्षांपूर्वीच्या षटकाराची आठवण करून दिली.

जावेद मियांदादने ३८ वर्षांपूर्वी असेच केले होते –

जावेद मियांदादने १९८६ मध्ये आशिया चषकादरम्यान असाच पराक्रम केला होता. त्यावेळी गोलंदाज चेतन शर्मा होता आणि शारजाहचे मैदान भरले होते. त्या सामन्यात जावेद मियांदादने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. आता मुंबई इंडियन्सची युवा महिला खेळाडू सजीवन सजनाने असेच काहीसे केले आहे. हा तिचा पहिलाच डब्ल्यूपीएल सामना होता आणि इतिहास रचून तिने या लीगच्या इतिहासाच्या पानांवर आपले नाव अजरामर केले आहे. कारण जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर पाच-सहा धावा हव्या असताना फलंदाज षटकार मारतो, असे क्वचितच पाहायला मिळते.

शेवटच्या चेंडूवर होती ५ धावांची गरज –

शेवटच्या षटकातील थराराबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. एलिस कॅप्सीने षटकाच्या पाचव्या चेंडूवर सेट खेळाडूची कर्णधार हरमनप्रीत कौरला ५५ धावांवर बाद केले. अशा स्थितीत पदार्पण करणाऱ्या सजीवन सजनाला येताच मोठा फटका खेळणे सोपे नव्हते. पण तिने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : मुशीर खानने रणजीत झळकावले पहिले शतक, पुजारा-रहाणे ठरले अपयशी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात १७१ धावा केल्या होत्या. ॲलिस कॅप्सीने ७५ धावांची शानदार खेळी केली. या लीगमधील कोणत्याही संघाची मुंबईविरुद्धची ही सर्वात मोठी धावसंख्या होती. मात्र दिल्ली संघाला त्याचा बचाव करता आला नाही. या विजयासह मुंबईने मोसमाची दमदार सुरुवात केली आहे. तसेच, गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत दिल्लीला जिथे पराभूत केले होते, आता तिथूनच एक नवीन सुरुवात केली आहे.