नवी दिल्ली : संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघावरील (डब्ल्यूएफआय) बंदी मंगळवारी उठवली. मात्र, ही बंदी उठवण्यात यावी यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा आरोप ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी जागतिक संघटनेच्या बंदी मागे घेण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करताना भारतीय कुस्ती महासंघाविरोधातील आंदोलन पुन्हा नव्याने सुरू करण्याचा इशाराही बुधवारी दिला.

हेही वाचा >>> आशियाई सांघिक बॅडिमटन स्पर्धा : सिंधूचे विजयी पुनरागमन, भारतीय महिला संघाचा चीनला धक्का

जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई तात्पुरती मागे घेताना बजरंग, साक्षी आणि विनेश फोगट यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही याची लेखी हमी ‘डब्लूएफआय’-कडून केली आहे. बजरंग, साक्षी आणि विनेश वर्षभराहूनही अधिक काळापासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत विजयी झालेले संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे बजरंग, साक्षी आणि विनेश यांनी निवडणुकीचाही निषेध केला होता. त्यातच नियमांचे उल्लंघन केल्याने भारतीय कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी तीन दिवसांतच क्रीडा मंत्रालयाने निलंबित केली.

हेही वाचा >>> ‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रोहितच कर्णधार’

‘‘जागतिक संघटनेने घातलेली बंदी उठवण्यात यावी यासाठी संजय सिंह यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असून, आपण कायद्याच्या वर आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी कुठलीही कसर सोडलेली नाही,’’ असे साक्षी म्हणाली. ‘‘भाजप खासदारांच्या निष्ठावंताना कुस्ती महासंघाचे कामकाज चालवण्याची परवानगी दिल्यास आम्हाला पुन्हा आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही,’’ असेही साक्षीने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘आम्ही आंदोलन केवळ स्थगित केले आहे, मागे घेतलेले नाही. मी कुस्तीमधून निवृत्त झाले असले तरी ब्रिजभूषण व त्यांच्या निकटवर्तीयांना महासंघावर टिकू देणार नाही. त्यांच्याकडून होणारा महिलांचा छळही सहन करणार नाही,’’ असे साक्षीने ठामपणे सांगितले. निवडणूक वेळेत न घेतल्यामुळे संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सावध भूमिका घेतली आहे. ‘‘आम्ही काय करणार आहोत, ते तुम्हाला कळवू,’’ असे मोघम उत्तर ठाकूर यांनी दिले.