आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन वेगळे होणार असल्याची चर्चा जोर धरून आहे. फ्रँचायझी आणि संजू यांच्यात नेमकं काय सुरू आहे आणि भविष्यात संजू राजस्थान संघाबरोबर असणार का हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. फ्रँचायझीपासून वेगळे होण्याची बातमी आल्यापासून, हा मुद्दा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यावर आता संजू सॅमसनने वक्तव्य केलं आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सपासून वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी तत्पर आहे. अनेक अफवा आणि चर्चांदरम्यान संजू सॅमसनचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रविचंद्रन अश्विनच्या ‘कुट्टी स्टोरीज’ या यूट्यूब पॉडकास्टवर बोलताना, केरळच्या या क्रिकेटपटूने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगितले. सॅमसन म्हणाला की राजस्थान रॉयल्सने त्याला एक व्यासपीठ दिलं जिथे त्याने आपल्यातील प्रतिभा जगासमोर मांडली.
संजू सॅमसनचं राजस्थान रॉयल्स संघाबाबत मोठं वक्तव्य
संजू सॅमसन म्हणाला, “माझ्यासाठी राजस्थान रॉयल्सची टीम, मॅनेजमेंट हे माझ्यासाठी सर्वस्व आहे, जणू एखाद्या जगासारखं आहे. केरळमधल्या एका छोट्या गावातील एका लहान मुलाला फक्त स्वतःचं टॅलेंट दाखवण्याची संधी हवी होती आणि मग राहुल सर व मनोज बडाले सरांनी मला ते व्यासपीठ दिलं, जेणेकरून मी जगाला माझ्यातलं कौशल्य दाखवू शकेन.”
तो पुढे म्हणाला, “त्यावेळी त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आरआरसोबतचा माझा प्रवास अतिशय उत्तम राहिला आहे आणि अशा फ्रँचायझीचा भाग झाल्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.”
संजू सॅमसन २०१३ ते २०१५ पर्यंत राजस्थानकडून खेळला. त्यानंतर तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) कडून दोन वर्षे खेळला. त्यानंतर तो २०१८ मध्ये राजस्थान संघात परतला. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने २०२२ मध्ये संघाला अंतिम फेरीत नेलं. २००८ नंतर राजस्थान संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला.
आयपीएल २०२५ मध्ये संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे संघाचे नेतृत्त्व रियान परागच्या खांद्यावर होते. २०२५ च्या हंगामात संघ फक्त ४ सामने जिंकू शकला. संजूला आयपीएळ २०२५ पूर्वी झालेल्या महालिलावात संघाने १८ कोटींना रिटेन केलं होतं. त्याच्याबरोबर यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, संदीप शर्मा आणि शिमरॉन हेटमायरला रिटेन केलं.