सर्फराझ खान याची भारताच्या कसोटी संघानंतर भारताच्या अ संघातही निवड न झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. सर्फराझ खानला घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली होती. पण त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आलं. यानंतर सिनियर संघात त्याला संधी मिळाली नाहीच, पण आता भारताच्या अ संघातही त्याची निवड करण्यात न आल्याने काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी गंभीरला लक्ष्य केलं आहे.
सर्फराझ खानची इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली नाही. त्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटीसाठीही त्याला निवडण्यात आलं नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध भारतीय संघाची घोषणा झाली, त्यातही सर्फराझच्या नावाचा उल्लेख नव्हता. आता यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी सर्फराझ खानला भारतीय संघातून वगळल्याबद्दल वक्तव्य केलं आहे. सर्फराझने अखेरचा सामना भारताकडून न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळला होता. त्याला ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
सर्फराझने त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करूनही, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठीही त्याचा विचार करण्यात आला नाही. याबाबत शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला की सर्फराझची निवड त्याच्या आडनावामुळे नाही झाली का?
शमा मोहम्मद पोस्ट करत म्हणाल्या, “सर्फराझ खानची निवड त्याच्या आडनावामुळे नाही करण्यात आली का? मी फक्त विचारतेय. गौतम गंभीरचं या विषयावर काय मत आहे हे आम्हाला माहित आहे.”
एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, सर्फराझने मुंबई संघ व्यवस्थापन आणि संघातली सर्वात वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेशी बोललं पाहिजे आणि शक्य असल्यास तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे त्याला नवीन चेंडूचा सामना करावा लागू शकतो. जर तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला तर त्याचा काही फायदा होणार नाही. भारताकडे या स्थानांसाठी इतर अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय आहेत.
पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश रेड्डी… जर सर्वजण फुट आणि उपलब्ध असतील तर ते अष्टपैलू खेळाडू म्हणून मधल्या फळीत स्थान मिळवतील. पंतला दुखापत झाल्यावर ध्रुव जुरेल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असं त्यांनी सुचवलं.
शमा मोहम्मद यांनी यापूर्वी मोहम्मद शमीचीही बाजू घेतली आहे. या वर्षी रमजान महिन्यात दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीनंतर शमी एनर्जी ड्रिंक प्यायला होता. यानंतर, अखिल भारतीय मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी रमजानमध्ये उपवास न ठेवल्याबद्दल त्यांना गुन्हेगार म्हटले होते. याशिवाय शमा मोहम्मदने रोहित शर्माबाबत वक्तव्यही केले होते, ज्यामुळे नंतर त्यांना माफी मागावी लागली होती.