पीटीआय, शेन्झेन (चीन)

China Masters 2025 Badminton Result :भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. तर पीव्ही सिंधूला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या कोरियाच्या आन से यंगकडून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत व्हावे लागले.

पॅरिस येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकणाऱ्या तसेच हाँगकाँग स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने चीनच्या रेन शियांग यू आणि शिये हाओनान जोडीला २१-१४, २१-१४ असे नमविले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सात्त्विक-चिराग जोडीने आक्रमक खेळ केला. त्यांनी ७-० अशी चांगली सुरुवात करताना पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-५ अशी आघाडी घेतली. चीनच्या जोडीने गुणांची कमाई करीत आघाडी १३-७ अशी कमी केली. सात्त्विक-चिराग जोडीने ही आघाडी १७-१० अशी केली. यानंतर पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये एक वेळ ७-७ अशी बरोबरी होती. मात्र मध्यंतरापर्यंत भारतीय जोडीला ११-९ अशी आघाडी घेण्यात यश मिळाले. मग सात्त्विक-चिराग जोडीने आपली आघाडी १९-१३ अशी वाढवत गेमसह सामना जिंकला.

सिंधूकडून निराशा

दोन ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूला कोरियन खेळाडूकडून ३८ मिनिटांत सामना १४-२१, १३-२१ असा गमवावा लागला. सिंधूला कोरियन खेळाडूविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. तिचा आनविरुद्ध हा सलग आठवा पराभव आहे. सिंधूची सामन्याला सुरुवात चांगली झाली नाही. तिला १-६ अशी मागे होती. आनकडे पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-५ अशी आघाडी होती. आपली लय कायम राखत कोरियन खेळाडूने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे ३-२ अशी काही काळ आघाडी होती. मात्र, आनने गेममध्ये पुनरागमन केले. आनला मध्यंतरापर्यंत ११-७ अशी आघाडी घेण्यात यश मिळाले. यानंतर कोरियन खेळाडूने कामगिरीत सातत्य राखताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. ‘‘गेला आठवडा माझ्यासाठी चांगला नव्हता, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणे ही सकारात्मक गोष्ट ठरली. आता ही लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल,’’ असे सिंधू म्हणाली.