रणजी ट्रॉफी २०२२-२३चा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्राने मनोज तिवारीच्या बंगाल संघाचा दारुन पराभव केला. बंगाल संघाला त्यांच्या यजमानपदी खेळल्या गेलेल्या सामन्यात ९ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला.
सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगालचा संघ पहिल्या डावात ५४.२. षटकात १७४ धावांत गुंडाळल्याने, कर्णधाराचा निर्णय योग्य ठरला. बंगालकडून शाहबाज अहमदने ६९ आणि अभिषेक पोरेलने ५० धावा केल्या. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट आणि चेतन साकारिया यांनी ३-३ बळी घेतले. चिराज जानी आणि डी जडेजा यांना २-२ बळी मिळाले.
सौराष्ट्र संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, ४ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्याच्या जोरावर सौराष्ट्रच्या संघाने ४०४ धावा केल्या. सौराष्ट्रतर्फे वासवडा याने ८१ धावा, चिराज जानीने ६० धावा, शेल्डन जॅक्सनने ५९ धावा आणि हार्विक देसाईने ५० धावा केल्या. बंगालकडून मुकेश कुमारने ४ तर आकाश दीप आणि ईशान पोरेलने ३-३ बळी घेतले.
त्याचवेळी बंगालचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांना प्रथम २३० धावांची आघाडी गाठावी लागली. प्रत्युत्तरात संघ २४१ धावांत गारद झाला. ज्यामुळे चौथ्या दिवशी सौराष्ट्रला १२ धावांचे लक्ष्य होते, ते सौराष्ट्राने सहज गाठले. जयदेव उनाडकटने दुसऱ्या डावात बंगालचे ६ फलंदाज बाद केले. या सामन्यात सौराष्ट्रने ९ विकेट्सने विजय मिळवला.
सौराष्ट्रचे दुसरे विजेतेपद –
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सौराष्ट्र संघाचे हे दुसरे विजेतेपद आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रच्या संघाने २०१९-२० मध्ये पहिले विजेतेपद पटकावले. गेल्या ११ हंगामांबद्दल बोलायचे झाल्यास, सौराष्ट्र संघाने ५ फायनल सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आणि तीन गमावले आहेत. गेल्या वर्षीही उपांत्य फेरी गाठण्यात संघाला यश आले होते.
संक्षिप्त धावफलक –
बंगाल (पहिला डाव) : ५४.१ षटकांत सर्वबाद १७४
सौराष्ट्र (पहिला डाव) : ११० षटकांत सर्वबाद ४०४
बंगाल (दुसरा डाव): ७०.४ षटकात सर्वबाद २४१
सौराष्ट्र (दुसरा डाव): २.४ षटकात १ बाद १४