भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी संघाचं कर्णधारपद लवकरच सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत विराट कोहलीन टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या निर्णयावर क्रिकेट विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीनं विराटच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. विराटनं ट्वीटरवर निर्णय जाहीर करण्यासाठी शेअर केलेल्या पत्रामध्ये सौरव गांगुलीसोबत याबाबत चर्चा केल्याचा उल्लेख केला आहे.

सौरव गांगुली म्हणतो…

विराट कोहलीसारख्या एका आजी कर्णधारानं वाढत्या तणावाचा संदर्भ देत टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय दिल्यानंतर एक माजी कर्णधार म्हणून आणि बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून देखील सौरव गांगुलीचं मत महत्त्वाचं ठरतं. विराटच्या निर्णयावर गांगुली म्हणतो, “विराट कोहली हा भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आणि आत्मसंयम आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधला तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. भविष्यातली वाटचाल डोळ्यांसमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीनं केलेल्या कामगिरीबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो”, असं गांगुली म्हणाला आहे.

 

आम्ही त्याला शुभेच्छा देतो…

दरम्यान, सौरव गांगुलीनं विराट कोहलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. “आम्ही आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीला शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तो अशाच तऱ्हेने भारतासाठी खूप धावा करत राहो”, असं देखील सौरव गांगुली म्हणाला आहे.

हर्षा भोगलेंनी व्यक्त केलं आश्चर्य!

सौरव गांगुलीप्रमाणेच क्रीडा समीक्षक हर्षा भोगले यांनी देखील विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी विराटनं भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर काहीसं आश्चर्य व्यक्त केलं आहे. “विराटची खेळाप्रतीची निष्ठा प्रचंड होती. मला वाटलं विराट कोहली आरसीबीचं (Royal Challengers Banglore) कर्णधारपद सोडेल. यामुळे त्याला किमान दोन महिने कॅप्टन्सीपासून सुट्टी मिळाली असती. मला आशा आहे की या निर्णयामुळे त्याला आवश्यक असणारा मानसिकदृष्ट्या आराम मिळेल. कुणास ठाऊक, यामुळे तो टी-२० फलंदाज म्हणून अजून मोठं यश मिळवेल”, असं हर्षा भोगले ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

 

Virat Kohli Steps Down : टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार; ट्वीटरवर केलं जाहीर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराटनं ट्वीटरवर केली घोषणा

विराट कोहलीनं आपल्या ट्वीटर हँडलवर टी-२० कर्णधारपद सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. “या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन”, असं विराटनं ट्वीट केलेल्या पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.