मँचेस्टर सिटीचा आघाडीवीर सर्जीओ अ‍ॅग्युरो याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर अर्जेटिनाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामन्यात बोस्निया आणि हेर्जेगोव्हिना संघाचा २-० असा सहज पराभव केला.
अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अर्जेटिनाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजविले. अ‍ॅग्युरोने अर्जेटिनाला मेस्सीची उणीव जाणवू दिली नाही. अ‍ॅग्युरोने ४०व्या मिनिटालाच अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. फेडेरिको फर्नाडेझच्या क्रॉसवर अ‍ॅग्युरोने मारलेला फटका बोस्नियाचा गोलरक्षक अस्मिर बेगोव्हिच याला अडवता आला नाही. ६६व्या मिनिटाला अ‍ॅग्युरोने डाव्या पायाने मारलेला फटका बेगोव्हिच याला चकवून थेट गोलजाळ्यात विसावला. या मोसमात अ‍ॅग्युरोने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये १३ गोल लगावले आहेत.
गेल्या १२ सामन्यांत फक्त एक सामना गमावणाऱ्या अर्जेटिनाला बुधवारी झालेल्या इक्वेडोरविरुद्धच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागली होती. २०१४ फुटबॉल विश्वचषकाच्या पात्रता फेरीत अर्जेटिनाला उरुग्वेकडून एकमेव पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र अर्जेटिनाने पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.