छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमधील दहा महसूल मंडळांत शुक्रवारी अतिवृष्टी नोंदविण्यात आली. दोन दिवसांत वीज पडून सहा जणांचा, तर एकाचा भिंत पडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बारोळ महसूल मंडळात सर्वाधिक १३५.२५ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. त्यापाठोपाठ तांदुळजा- १२३, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी महसूल मंडळात ८७, तर उदगीर तालुक्यातील नागलगाव, औसा तालुक्यातील किल्लारी या तालुक्यांमध्ये ८७ मिमी पाऊस नोंदवण्यात आला.
वीज पडल्यामुळे सहा जणांचा तर भिंत पडून एक जणाचा असे एकूण सात जणांचा मृत्यू झाला. पक्ष्यांची घरटी खाली पडली आणि मोठी ५० पेक्षा अधिक जनावरे वीज पडून मृत्युमुखी पडली. १५३ बाधित गावांमध्ये २५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक चार जणांचा मृत्यू झाला असून, नायगाव तालुक्यातील मौजे कन्हाळा येथील वेंकटी लक्ष्मण दंडलवाड यांचा भिंत पडून मृत्यू झाला. सागर बळीराम गाडे (२४, रा. राजुरी, जि. उस्मानाबाद), वजीर शेख चांद (४०, मौजे म्हाळजा, जि. नांदेड), तारासिंह बाबूराम (मौजे जवाहरनगर तुप्पा, जि. नांदेड), बिभीषण घुले (मौजे केळगाव, ता. केज, जि. बीड), राजप्पा वेंकट कल्याणी (मौजे तगरखेडा, ता. नांदेड, जि. लातूर) आणि धोंडीराम पुंडलिक भोसले (बोरगाव, ता. चाकूर) अशी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पिकांचे नुकसान
गेल्या चार दिवसांत अवकाळीमुळे ८०५८ हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या कालावधीत वीज पडून एकूण दहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची हजेरी
अकोला जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पाऊस पडला. बुलढाणा येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीवर परिणाम झाला.