पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय खेळाडूंशी त्याचे मैदानावर आणि मैदानाच्या बाहेरही काही प्रसंगी झालेले शाब्दिक वाद चर्चेचा विषय राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनं भारताला, बीसीसीआयला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेलं जाहीर विधान चर्चेत आलं आहे. याचबरोबर शाहीद आफ्रिदीनं बीसीसीआयला मोठेपणाची जाणीवही करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोहामधील लिजंड्स लीग क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत शाहीद आफ्रिदीनं आपली भूमिका मांडली. यावेळी क्रिकेट हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात मोलाची भूमिका बजावेल, असंही शाहीद म्हणाला. बीसीसीआय हे नक्कीच मोठं क्रिकेट बोर्ड आहे. पण त्यामुळेच त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असंही शाहीद आफ्रिदीनं यावेळी नमूद केलं.

“BCCI नं अधिक जबाबदारी उचलावी”

“बीसीसीआय हे एक खूप ताकदवान क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे बीसीसीआयनंच आता जास्त जबाबदारी उचलून दोन्ही देशांमधले क्रिकेटच्या पातळीवरचे संबंध सुधारण्यास मदत करायला हवी. आम्हाला कुणाशीतरी मैत्री करायची आहे, पण समोरून कुणी आमच्याशी बोलतच नसेल, तर आम्ही काय करणार? बीसीसीआय मोठं क्रिकेट बोर्ड आहे यात शंकाच नाही. पण जेव्हा तुम्ही ताकदवान असता, तेव्हा तुमच्यावर जास्त जबाबदारी असते. तुम्ही शत्रू वाढवण्याचा प्रयत्न न करता मित्र वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्ही जेवढे मित्र करता, तेवढे तुम्ही अधिक सामर्थ्यशाली होत जाता”, असं शाहीद आफ्रिती म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार विनंती

दोन्ही देशांमध्ये क्रिकेट पुन्हा खेळलं जावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शाहीदनं यावेळी नमूद केलं. तसेच, यासाठी थेट नरेंद्र मोदींना विनंती करणार असल्याचं तो म्हणाला. “दोन्ही देशांमध्ये क्रिकेट घडू द्यावं, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही विनंती करेन. सुरक्षेचाच प्रश्न असेल, तर सध्या पाकिस्तानमध्ये अनेक देश येऊन क्रिकेट खेळून गेले. भूतकाळात आम्हाला तर भारतातूनही धमक्या येऊन गेल्या. पण जर दोन्ही देशांच्या सरकारकडून परवानगी मिळाली, तर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट होऊ शकेल. जर हे घडलं नाही, तर देशविरोधी शक्तींना आपणच संधी दिली असं होईल. त्यांना तर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट व्हायला नकोच आहे”, असं शाहीदनं नमूद केलं.

“संवाद होणं गरजेचं आहे”

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये आपापसात संवादच होत नाही, असंही शाहीद आफ्रिदीनं नमूद केलं आहे. “खरी गोष्ट ही आहे की आपण कधीच एकमेकांशी चर्चा करत नाही. संवाद हा सर्वात महत्त्वाचा आहे. राजकीय नेते हेच करतात. ते एकमेकांशी संवाद करतात. जोपर्यंत तु्म्ही बसून चर्चा करत नाही, तोपर्यंत कोणतीच समस्या सुटणार नाही. भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला असता, तर बरं झालं असतं. आम्हाला आणि आमच्या सरकारलाही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध हवे आहेत”, असं शाहीद आफ्रिदीनं नमूद केलं.

२००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यापासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी गेलेला नाही आणि पाकिस्तानी संघही भारतात दौऱ्यासाठी आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये फक्त त्रयस्थ ठिकाणीच मोठ्या स्पर्धांमध्ये सामने झाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi to request prime minister narendra modi india vs pakistan cricket matches pmw
First published on: 21-03-2023 at 14:04 IST