पाकिस्तान क्रिकेट संघाचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानला वनडे कर्णधारपद गमावलं लागण्याचं वेगळंच कारण समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची रावळपिंडी टेस्ट सुरू असतानाच वनडे कर्णधार म्हणून रिझवानऐवजी शाहीन शहा आफ्रिदीच्या नावाची घोषणा केली. पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात अपयश हे त्यामागचं कारण नसल्याचं स्पष्ट होत आहे. टाईम्सऑफइंडिया.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार बेटिंग कंपनीचा प्रचार करायला नकार दिल्याप्रकरणी रिझवानला कर्णधारपद गमवावं लागलं आहे.
माजी कर्णधार रशीद लतिफ यांनी यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली आहे. बेटिंग कंपनीचा प्रचार करू शकत नाही असं रिझवानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवलं. त्यामुळेच त्याला कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रायोजक म्हणून काही बेटिंग कंपन्यांशी करार केला आहे. रिझवानला हे पटलं नाही. यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतल्याचा फटका त्याला बसला असं लतीफ यांनी म्हटलं आहे.
यंदाच्या वर्षीच कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सेंट किट्स अँड नेव्हिस संघाकडून खेळताना रिझवानने बेटिंग फर्मचा लोगो जर्सीवर परिधान करण्यास नकार दिला होता. बेटिंग कंपनीच्या लोगोविना जर्सी परिधान करून तो खेळला होता. ती बेटिंग कंपनी किट्स अँड नेव्हिस संघाची प्रमुख प्रायोजक होती.
रिझवानची उचलबांगडी होण्याचं आणखी एक कारण लतीफ यांनी नमूद केलं. पॅलेस्टाईन विषयासंदर्भात रिझवानने आपली भूमिका मांडली होती. त्याचाही परिणाम असू शकतो असं लतीफ यांनी म्हटलं आहे. रिझवान पॅलेस्टाईन संदर्भात बोलला असेल तर त्याला कर्णधारपदावरून काढणार का? असं लतीफ यांनी कॉट बिहाइंड या आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलं आहे.
पॅलेस्टाईन नागरिकांप्रति रिझवानने संवेदना व्यक्त केली होती. इस्लामिक संस्कृती संदर्भातही तो बोलला होता. रिझवानला बाजूला करण्यात वनडे आणि टी२० प्रशिक्षक माईक हेसन यांचाच वाटा आहे. त्यांना ड्रेसिंगरुममध्ये हे कल्चर आवडत नाही. ड्रेसिंगरुममध्ये अशा विचारांचे लोक नकोत अशी त्यांची भूमिका आहे. इंझमाम उल हक, सईद अन्वर, साकलेन मुश्ताक हे कर्णधार असताना आम्हाला कोणतीही अडचण जाणवली नाही. कोणी काहीही म्हटलं नाही.
दरम्यान वनडे आणि टी२० प्रकारातील प्रशिक्षक माईक हेसन, हाय परफॉर्मन्स डिरेक्टर आकिब जावेद आणि निवडसमिती यांच्यातील बैठकीनंतर आफ्रिदीला वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. रिझवानने २० वनडेत पाकिस्तानचं नेतृत्व केलं. रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला २-१ असं नमवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० असं निर्भेळ यश मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र पाकिस्तानची कामगिरी सर्वसाधारण राहिली. दोन सामन्यांनंतर पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. वनडे कर्णधार म्हणून रिझवानच्या नावावर ९ विजय आणि ११ पराभव आहेत.
रिझवान आणि आफ्रिदी दोघेही रावळपिंडी टेस्ट खेळत आहेत. टेस्ट सुरू असतानाच पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली. २५वर्षीय शाहीन शहा आफ्रिदीने ३२ टेस्ट, ६६ वनडे आणि ९२ टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.