Sunil Gavaskar Statement On Shubman Gill Captaincy: आयपीएल २०२५ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मानंतर कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी करून पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या श्रेयस अय्यरला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली जात आहे. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

युवा फलंदाज शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं आहे. तर काहींनी विरोधही केला आहे. सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स तक वर बोलताना म्हटले की, ” शुबमन गिल हा कर्णधारपदासाठी योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्याला आपल्याला संधी द्यावी लागेल. आपण अशा चर्चा करून त्याच्यावर दबाव टाकतोय. इंग्लंड दौऱ्याआधी त्याच्यावर दबाव टाकण्याची काहीच गरज नाही. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपद मिळण्याबाबत कुठलीही चर्चा व्हायला नको.”

श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी

श्रेयस अय्यरने गेल्या काही वर्षात आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर हा आयपीएल स्पर्धेत ३ वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवणारा पहिलाच कर्णधार आहे. याआधी कुठल्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. त्यानंतर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं आणि ट्रॉफी जिंकूनही दिली होती. या हंगामात त्याने पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करून श्रेयस अय्यरकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. सलग २ वर्षांत २ संघांना आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणारा तो पहिलाच कर्णधार ठरू शकतो.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय कसोटी संघ:

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.