देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस

Shreyas Iyer Test Cricket Break: श्रेयस अय्यरने भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघातील दुसऱ्या अनधिकृत कसोटीतून माघार घेतली. श्रेयसने सामना सुरू व्हायच्या काही तासआधीच कर्णधारपद सोडत संघातून माघार घेतली. श्रेयसच्या या निर्णयाने सर्वच जण चकित झाले. यानंतर श्रेयसने हा निर्णय का घेतला, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान आता श्रेयसने कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) पत्र लिहून कळवलं आहे.

श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय का घेतला?

श्रेयस अय्यरने काही काळासाठी लाल चेंडूचं क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण म्हणजे त्याची पाठीची दुखापत आणि त्यामुळे थकवा येत असल्याने हा ब्रेक घ्यायचा ठरवलं आहे.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी भारत अ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या अय्यरने मंगळवारी सामन्यापूर्वी दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यातून आपले नाव मागे घेतलं. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि निवड समितीशी सल्लामसलत केल्यानंतर, अय्यरने औपचारिकपणे ईमेलद्वारे आपलं अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला.

इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरने निवडकर्त्यांना कळवलं आहे की त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे आणि त्याचं शरीर सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटचा भार सहन करू शकत नाही. अय्यर चार दिवसांपेक्षा जास्त काळ मैदानावर सातत्याने खेळू शकत नाही आणि म्हणूनच त्याचे शरीर त्याला दीर्घ स्वरूपात खेळण्याची परवानगी देईपर्यंत तो विश्रांती घेण्याचा विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

अय्यरने बोर्डाला सांगितलं की तो गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी सामन्यात खेळला होता जिथे त्याने षटकांदरम्यान ब्रेक घेतला होता. पण, तो भारत अ संघासाठी किंवा कसोटी क्रिकेट खेळताना असं करू शकत नाही.

सूत्रांनी श्रेयसच्या ब्रेकबाबत माहिती देताना सांगितलं, “त्याने आम्हाला कळवलं आहे की तो कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेणार आहे. निवडकर्त्यांना आता त्याच्या भविष्याबद्दल स्पष्टता असल्याने त्याने स्वत: याबाबत स्पष्ट केलं ही चांगली गोष्ट आहे. येत्या काही महिन्यांत तो रेड-बॉल क्रिकेट खेळणार नाही. त्याने बोर्डाला कळवलं की तो भविष्यात फिजिओ आणि ट्रेनरशी चर्चा करून त्याच्या शरीराचे मूल्यांकन करेल आणि त्यानंतर यावर निर्णय घेईल.”