खांद्याच्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण आता तो तंदुरुस्त झाला आहे. श्रेयस अय्यर यूएईमध्ये होणार्‍या आयपीएल २०२१च्या उत्तरार्धात खेळणार आहे. मात्र त्याने कर्णधारपदाचा निर्णय संघ मालकांवर सोडला आहे. आयपीएल २०२१च्या आधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता.

आयपीएल २०२१च्या हंगामात ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. दिल्लीने हंगामात चांगले प्रदर्शन केले. स्पर्धा स्थगित झाली, तेव्हा त्यांनी आठ पैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. त्यामुळे श्रेयसच्या कमबॅकमुळे दिल्लीला आनंदाची बातमी मिळाली आहे, पण पंतचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.

एका यूट्यूब वाहिनीशी झालेल्या संभाषणात श्रेयस अय्यर म्हणाला, ”माझा खांदा ठीक झाला आहे. आता शेवटच्या टप्प्यात ताकद मिळवण्यासाठी उपचार घेतले जात आहेत. यास एक महिना लागू शकेल आणि हे स्पष्ट आहे की या कालावधीत प्रशिक्षण सुरू राहील. याशिवाय मी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळू शकेन.”

हेही वाचा – श्रीलंका दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया पाकिस्तानला देणार धक्का?

कर्णधारपदाच्या प्रश्नाबद्दल श्रेयस म्हणाला, ”मला कर्णधारपदाबद्दल माहीत नाही. हे मालकांच्या हाती आहे. पण संघ चांगला खेळत होता आणि आम्ही अव्वल आहोत. हेच माझ्यासाठी चांगले आहे. ट्रॉफी जिंकणे हे माझे मुख्य लक्ष्य आहे कारण दिल्लीला अद्याप ते करता आलेले नाही.”