नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेक जण काही ना काही संकल्प करत असतात. आता हे संकल्प किती पूर्ण होतात आणि किती अपूर्ण राहतात याचा हिशेब वर्षाच्या शेवटी लावून पुन्हा नव्या वर्षात नवे संकल्प केले जातात! सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळीही असे संकल्प करत असतात. भारताचा सलामीवीर शुबमन गिल यानंही गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात ३१ डिसेंबर रोजी पाच संकल्प केले होते. त्यानं स्वत:च या संकल्पांच्या चिठ्ठीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे!
काय आहे शुमबन गिलच्या पोस्टमध्ये?
शुबमननं ३१ डिसेंबर २०२३ रोजी या फोटोसोबतच त्यावर पोस्टही लिहिली आहे. “बरोबर एक वर्षाआधी मी हे संकल्प लिहून काढले होते. आता २०२३ संपत आलेलं असताना हे वर्ष अनेक अनुभवांनी सिद्ध ठरल्याची भावना आहे. हे वर्ष खूप धम्माल आणि इतरही अनेक शिकवून जाणार ठरलं. या वर्षाचा शेवट ठरवला तसा झाला नाही. पण मी हे अभिमानानं सांगू शकतो की आम्ही आमच्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो होतो. आम्ही आमची सर्व ताकद पणाला लावली होती”, असं शुबमन गिलनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“येणारं वर्ष वेगळ्या प्रकारची आव्हानं आणि संधी घेऊन येणार आहे. मला आशा आहे की २०२४मध्ये आम्ही आमची ध्येय साध्य करू. मला आशा आहे की तुम्हा सर्वांनाही या वर्षी प्रेम, आनंद आणि तुमचं प्रत्येक काम पार पाडण्यासाठी सामर्थ्य मिळो”, अशा शब्दांत शुबमन गिलनं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काय होते शुबमन गिलचे पाच संकल्प?
शुबमन गिलनं शेअर केलेला फोटो त्यानं ३१ डिसेंबर २०२२ रोजी लिहिलेल्या एका चिठ्ठीचा आहे. यात सगळ्यात पहिला संकल्प ‘भारतासाठी सर्वाधिक शतकं’ हा आहे. दुसरा संकल्प ‘कुटुंबाला आनंदी करणं’ हा आहे. तिसरा संकल्प कामगिरी साध्य करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि त्यात स्वत:वर कमी ताण घेणे हा आहे. चौथा संकल्प देशासाठी विश्वचषक जिंकणे हा असून पाचवा संकल्प सर्वाधिक धावांसाठीची ऑरेंज कॅप मिळवणे हा आहे.
२०२३ सालात शुबमन गिलच्या नावावर १ कसोटी शतक, तर ५ एकदिवसीय शतकं आहेत. त्यासोबत ९ एकदिवसीय अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिलच्या नावावर २०२३ सालात २५८ धावा असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५८४ धावा त्यानं फटकावल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला.