Shubman Gill Surpasses Rohit Sharma in WTC: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने घरच्या मैदानावरही आपला फॉर्म कायम ठेवला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला जात आहे. या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत १७५ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार शुबमन गिलने संघाचा डाव उचलून धरला. यासह कर्णधार गिल आता शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, नितीश रेड्डी आणि कर्णधार शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी केली असून भारतीय संघाने आतापर्यंत दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात चार विकेट गमावून ४२७ धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल ७५ धावा करत नाबाद परतला आहे.

शुबमन गिलने अर्धशतकी कामगिरी करताच मोठी कामगिरी केली आहे. दिग्गज रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांचा मोठा विक्रम मागे टाकत आता गिल नंबर वन ठरला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत शुबमन गिल हा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आणि त्याने ऋषभ पंतचा विक्रम मोडला. गिलने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत २,७७१ धावा केल्या आहेत.

शुबमन गिलनंतर ऋषभ पंत दुसऱ्या स्थानी आहे, ज्याने WTC मध्ये एकूण २७३१ धावा केल्या आहेत, तर गिलने आता इतर सर्व भारतीय फलंदाजांना मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

शुबमन गिल – २७७१* धावा
ऋषभ पंत – २७३१ धावा
रोहित शर्मा – २७१६ धावा
विराट कोहली – २६१७ धावा
रविंद्र जडेजा – २५०५ धावा

शुबमन गिलने २०२० मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केलं आणि तेव्हापासून तो संघातील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आतापर्यंत त्याने ३९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २७७१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ९ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली आहेत.

शुबमन गिलने या खेळीदरम्यान कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो १२वा भारतीय कर्णधार बनला. कर्णधार म्हणून १२,८८३ धावा करणारा विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे.