India vs England, Shubman Gill Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहास रचला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना गिलने दमदार द्विशतकी खेळी केली. यासह त्याने भारती संघाला पहिल्या डावात ५८७ धावांपर्यंत पोहोचवलं आहे. दरम्यान गिलने भारतीय संघाकडून सर्वात मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे.
शुबमन गिल हा परदेशात (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड) सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याची मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनिच्या मैदानावर २४१ धावांची खेळी केली होती. याआधी राहुल द्रविडने ॲडीलेडच्या मैदानावर २३३ धावांची खेळी केली होती. तर सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावर २२१ धावांची खेळी केली होती. गिलने या डावातील २४२ वी धाव घेताच या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला.
परदेशात( दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड) सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय फलंदाज
शुबमन गिल – २६९ धावा
सचिन तेंडुलकर – २४१ धावा
राहुल द्रविड – २३३ धावा
सुनील गावसकर – २२१ धावा
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने २०१९ मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २५४ धावांची खेळी केली होती. २५५ धावांचा पल्ला गाठताच गिलने विराटचा हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २४३ धावांची दमदार खेळी केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार
शुबमन गिल – २६९ धावा
विराट कोहली – २५४ धावा
विराट कोहली – २४३ धावा