भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाला सुरूवात झाली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद आता युवा खेळाडू शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आले आहे. त्याच्यासमोर पहिलंच मोठं आव्हान इंग्लंड दौरा आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका येत्या २० जूनपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी गिलने कर्णधार म्हणून फोटोशूट केला आहे.
शुबमन गिलच्या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. शुबमन गिल या फोटोशूटमध्ये कर्णधाराचं जॅकेट आणि कसोटी पदार्पणाची कॅप घातली आहे. तर बॅटसह त्याने काही फोटो शेअर केले आहेत. शुबमन गिल एमआरएफची बॅट वापरतो, या बॅटवर प्रिन्स लिहिलं आहे. त्याच्या बॅटचा फोटो पाहून त्याला चाहत्यांनी सोशल मीडियावर सुनावलंय.
भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या बॅटमुळे चाहते वैतागले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी गिलने फोटोशूट दरम्यान त्याची बॅट दाखवली, ज्यामध्ये एमआरएफच्या स्टिकरसह प्रिन्स लिहिलेले होते. क्रिकेटमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळे शुबमन गिलला ‘प्रिन्स’ हे नाव मिळाले आणि आता त्याच्या बॅटवरही तेच लिहिलेलं आहे. गिलच्या बॅटवर प्रिन्सचा टॅग लिहिललं क्रिकेट चाहत्यांना आवडलेलं नाही. भारताचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अहंकारापोटी त्याने असं केल्याचे चाहते म्हणत आहेत.
क्रिकेट चाहत्यांनी शुबमन गिलवर टीका केली आणि त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची आठवण करून दिली, जे क्रिकेट जगतात प्रसिद्ध असूनही बॅटवर कधीही त्यांनी नावं लिहिलं नाही. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव तर विराट कोहलीला किंग अशी उपाधी मिळाली होती.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, स्टीव्ह वॉ, ब्रायन लारा आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर दिसला आहे, परंतु क्रिकेट जगताने दिलेल्या नावाचा वापर कोणीही बॅटवर केलेला नाही. गिलने असे करून चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे.