Shubman Gill Statement on India Defeat IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा, विराट कोहली त्यांच्या पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरले. दरम्यान पराभवानंतर कर्णधार गिलने मोठं वक्तव्य केलं.
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पर्थमध्ये पावसामुळे ४ वेळा सामना थांबवण्यात आला. यामुळे सामना अखेरीस २६ षटकांचा खेळवण्यात आला. भारताने २५ धावांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिलच्या रूपात ३ विकेट्स गमावल्या. या खराब सुरूवातीमुळे संघ २६ षटकांत १३६ धावाच करू शकला. या खराब सुरूवातीचा फटका बसल्याने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य मिळालं.
ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत हे लक्ष्य गाठत सामना ७ विकेट्सने आपल्या नावे केला. अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी यांनी चांगली कामगिरी केली. पण कांगारू संघाचा कर्णधार मिचेल मार्शच्या नाबाद ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला.
शुबमन गिल भारताच्या पराभवानंतर म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्यानंतर आपण पुनरागमनाचा प्रयत्न करतो, पण ते कधीही सोपं नसतं. या सामन्यात बरंच काही शिकायला मिळालं आणि सकारात्मक गोष्टीही घडल्या. २६ षटकांत १३० धावांचा बचाव करताना सामना आम्ही खोलवर नेऊ शकलो, त्यामुळे समाधानी आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही जिथेही खेळतो तिथे मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो.”
पॉवरप्लेमध्ये भारताने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्या झटपट विकेट गमावल्या. गिलच्या मते इथूनच भारतीय संघ मागे पडला आणि सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. भारताकडून रोहित शर्मा १४ चेंडूत ८ धावा करत बाद झाला, तर शुबमन गिल १८ चेंडूत १० धावांवर बाद झाला. विराट कोहली खातंही न उघडता माघारी परतला. अखेरीस केएल राहुलने ३१ चेंडूत ३८ धावा केल्या, तर अक्षर पटेलने ३८ चेंडूत ३१ धावा केल्या. याशिवाय पदार्पणवीर नितीश रेड्डीने महत्त्वपूर्ण १९ धावा केल्या.