Shubman Gill Statement on India Historic Win vs England: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने त्याच्या नेतृत्त्वात संघाला पहिला विजय मिळवून दिला आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर एजबेस्टन कसोटीत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. टीम इंडियाने इंग्लंडचा ३३६ धावांनी मोठा पराभव केला आणि कसोटी इतिहासात इतर संघांच्या घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय मिळवला. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संघाचा कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला, पाहूया.
शुबमन गिल भारताच्या विजयाचा हिरो ठरला आणि सामनावीराचा पुरस्कारही त्याने पटकावला. गिलने पहिल्या डावात २६९ धावा आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची वादळी खेळी केली. यासह त्याने एका सामन्यात ४३० धावा करत मोठा विक्रमही नावे केला आहे. गिल कसोटी सामन्यात ४०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा तो दुसरा भारतीय आणि एकूण नववा फलंदाज ठरला. तर शुबमन गिलशिवाय गोलंदाजीत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आकाशदीपने सामन्यात एकूण १० तर सिराजने ७ विकेट्स घेतले.
शुबमन गिलने भारताच्या गोलंदाजी आणि फिल्डिंगचं कौतुक केलं आणि दोन्ही विभागात संघाने चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं. भारताने पहिल्या कसोटीत अनेक झेल सोडले होते. गिल विजयानंतर म्हणाला, “गेल्या सामन्यानंतर आम्ही ज्या मुद्द्यांवर चर्चा केली होती, त्या सर्वच गोष्टींमध्ये या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग विभागात आश्चर्यकारक कामगिरी केली. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर, जर आम्ही ४००-५०० धावा करू शकलो तर ते पुरेसं असेल, याची आम्हाला कल्पना होती. आम्ही हेडिंग्लेमध्ये जितके झेल सोडले तीच चूक आम्ही प्रत्येक वेळेस करणार नाही आहोत.”
शुबमन गिल भारताच्या गोलंदाजांबद्दल विजयानंतर काय म्हणाला?
गोलंदाजीबद्दल कर्णधार म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्याप्रकारे त्यांनी इंग्लंडच्या वरच्या फळीला बाद केलं, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्या दोघांनीही आणि प्रसिधने चांगली गोलंदाजी केली. प्रसिधला सिराज-आकाशदीपइतके विकेट्स मिळाले नाही, पण त्याने गोलंदाजी उत्तम केली.”
आकाशदीपच्या गोलंदाजीबद्द्ल शुबमन म्हणाला, “आकाशदीपने खूप मनापासून गोलंदाजी केली. त्याने योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करत होता जे या खेळपट्टीवर खूप कठीण होतं. त्याने संघासाठी खूप कमालीची कामगिरी केली आहे.”
आपल्या फलंदाजीबद्दल गिल म्हणाला, “मी माझ्या खेळाबाबत खूप कम्फर्टेबल आहे आणि जर माझ्या योगदानामुळे आम्हाला मालिका जिंकण्यास मदत झाली तर सर्वात आनंदी मीच असेन. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मला एका फलंदाजासारखे खेळायचं आहे आणि मैदानावर जाऊन एखाद्या फलंदाजाप्रमाणेच निर्णय घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा जेव्हा फलंदाजी करताना आपण कर्णधारासारखा विचार करतो तेव्हा एक फलंदाज म्हणून आवश्यक असलेली जोखीम आपण पत्करत नाही.”
जसप्रीत बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही, यावर बोलताना तो म्हणाला, “हो तो १०० टक्के तो कसोटी सामना खेळणार आहे. लॉर्ड्सवर खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. जगातील आयकॉनिक स्टेडियमपैकी एक असलेल्या मैदानावर लहानापणापासून खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असत आणि लॉर्ड्सवर कसोटी सामन्यात आपल्या देशाचे नेतृत्व करण्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणताही नाही.”