म्युनिक : भारताची आघाडीची नेमबाज सिफ्त कौर सामराने हंगामातील तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकांची कमाई केली. विश्वविक्रमाची सध्याची मानकरी असलेल्या २३ वर्षी सिफ्तने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत ४५३.१ गुणांची कमाई केली. नॉर्वेची जीनेट हेग ड्यूस्टेडने ४६६.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. स्वित्झर्लंडच्या एमिली जॅगीला ४६४.८ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एमिली ५९० गुणांसह पात्रता फेरीत नवव्या स्थानी होती. मात्र, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली.

पात्रतेत सिफ्तने नीलिंग, प्रोन आणि स्टॅन्डिंग या तीन प्रकारांत मिळून एकूण ५९२ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान मिळवले होते. फ्रान्सच्या अगाथे सेसिल कॅमिली गिरार्डचेही ५९२ गुण होते. मात्र, १० गुणांचा वेध अधिक वेळा साधल्याने ती पात्रतेमध्ये अग्रस्थानी राहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वित्झर्लंडची ऑड्रे गोगनियाट पात्रतेमध्ये तिसऱ्या स्थानी होती. अन्य भारतीयांमध्ये आशी चौक्सी पात्रता फेरीत ५८९ गुणांसह ११व्या, तर अंजुम मुद्गिल ५८६ गुणांसह २७व्या स्थानी राहिली. वर्षाच्या सुरुवातीला ब्यूनोस आयर्स येथे झालेल्या विश्वचषकात सिफ्तने सुवर्णपदक मिळवले होते.