SL vs BAN, Najmul Hossain Shanto Century Celebration: क्रिकेटमध्ये गोलंदाजाने ५ विकेट्स घेतल्यानंतर आणि फलंदाजाने शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन करणं साहजिक आहे. शतक पूर्ण केल्यानंतर अनेक फलंदाज हेल्मेट काढून बॅट हवेत उंचावतात आणि आपल्या शतकाचं सेलिब्रेशन करतात. तर काही अतिउत्साही फलंदाज हटके पद्धतीने सेलिब्रेशन करतात. काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने शतक झळकावल्यानंतर कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं. त्याच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा रंगली होती. आता बांगलादेशच्या कसोटी संघाचा कर्णधार नजमुल हुसैन शान्तोने देखील शतक झळकावल्यानंतर हटके सेलिब्रेशन करण्याच्या प्रयत्न केला, पण त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
बांगलादेशचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ह संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. श्रीलंकेतील गॉलच्या मैदानावर सुरू असलेला हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ साखळीतील पहिला सामना आहे. पहिल्याच सामन्यात मुशफिकुर रहीम आणि नजमुल हुसेन शान्तोने दमदार फलंदाजी केली. दोघांनी शतकं झळकावली. दरम्यान नजमुल हुसेन शान्तोच्या शतकापेक्षा त्याने शतक झळकावल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन जास्त चर्चेत राहिलं.
नाद केला, पण वाया गेला
या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. तर झाले असे की, बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना श्रीलंकेकडून ७४ वे षटक टाकण्यासाठी प्रथात जयसूर्या गोलंदाजीला आला. या षटकात हुसेन शान्तोने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने फाईन लेगच्या दिशेने स्वीप शॉट मारला आणि दोन धावा घेतल्या. यासह त्याने आपलं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने धावत असनाताच हेल्मेट काढलं, त्यानंतर त्याने उडी मारली.
मात्र, त्याचे पाय मैदानावर टेकताच त्याला पुन्हा एकदा उडी मारावी लागली. श्रीलंकेच्या खेळाडूने चेंडू फेकल्यामुळे त्याच्या सेलिब्रेशनमध्ये व्यत्तय आला. त्याचा तोल जाऊन तो पडणार होता, मात्र त्याने स्वत:ला सावरलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांना हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीला आलेला शदनाम इस्लाम १४ तर अनामुल हक शून्यावर माघारी परतला. त्यानंतर नजमुल हुसेन शान्तो आणि मुशफिकुर रहिम या दमदार शतकं झळकावली. दोघांनी मिळून २५० हून अधिक धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या ३०० पार पोहोचवली आहे.