फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सौरभ कुमारची या संघात निवड झाली आहे. २८ वर्षीय सौरभ डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा लिलावात सौरभला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. सौरभची मूळ किंमत २० लाख रुपये होती. २०२१च्या लिलावात सौरभला पंजाब किंग्जने सौरभला संघात दाखल केले होते.

सौरभ कुमारने आतापर्यंत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.१५च्या सरासरीने १९६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १६ वेळा एका डावात ५ आणि ६ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून त्याने २९.११च्या सरासरीने १५७२ धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानात राशिद खानला का मिळाला गार्ड ऑफ ऑनर? आफ्रिदीनं मारली मिठी!

सौरभ कुमार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा एक भाग होता. मात्र, तेथे त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला दोन कसोटीत चार विकेट घेता आल्या आणि फलंदाजीत केवळ २३ धावा करता आल्या. आयपीएलमध्ये सौरभ पंजाबव्यतिरिक्त २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन (तंदुरुस्तीआधारे), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.