scorecardresearch

Premium

सौरव गांगुली तब्बल सहा मिनिटे उशिरा मैदानात आला, तरी Timed Out झाला नाही, १६ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यूजची फलंदाजीला येण्याची वेळ संपली होती, त्यामुळे त्याला शाकिब-अल-हसनच्या अपीलनंतर पंचांनी बाद घोषित केलं.

Sourav Ganguly not timed out
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर टाईम आऊट होण्याची नामुष्की ओढवली होती. (PC : AP/screengrab via YouTube)

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये सोमवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईमआउट घोषित करण्यात आले. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दोन मिनिटात पुढचा फलंदाज मैदानात यायला हवा, हा क्रिकेटचा नियम आहे. परंतु, मॅथ्यूजला मैदानात येण्यास उशीर झाल्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनसह सर्व खेळाडूंनी मॅथ्यूजला बाद घोषित करावं यासाठी पंचांकडे अपील केलं. त्याप्रमाणे पंचांनी त्याला बाद घोषित केलं. त्यामुळे क्रिकेटच्या दिडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू टाईमआऊट पद्धतीने बाद झाला आहे.

अँजेलो मॅथ्यूज क्रिकेट इतिहासातला टाईमआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. परंतु, हा लाजिरवाणा विक्रम १६ वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावे झाला असता. १६ वर्षांपूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात गांगुलीवर ही नामुष्की ओढावली होती. कारण, गांगुली दोन-तीन नव्हे तर तब्बल सहा मिनिटे उशिराने खेळपट्टीवर आला होता. परंतु. दक्षिण आफ्रिकेचा त्या सामन्यातील कर्णधार ग्रॅमी स्मिथने खेळभावना आणि दिलदारपणा दाखवत पंचांकडे अपील केलं नाही आणि गांगुलीला खेळू दिलं.

Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
The team selection for the remaining matches india against England test match continues
श्रेयसच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर; इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांसाठी संघनिवडीची प्रतीक्षा कायम
Nasir Hussain believes Kohli unavailability is a loss for world cricket including India sport news
कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे भारतासह जागतिक क्रिकेटचे नुकसान! इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत

नेमकं काय घडलं होतं?

ही २००७ सालची गोष्ट आहे. तेव्हा भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. उभय संघांमध्ये केपटाऊन येथे कसोटी सामना खेळवला जात होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी आणि भारताच्या दुसऱ्या डावात एक विचित्र प्रसंग घडला होता. डावाच्या तिसऱ्याच षटकात अवघ्या सहा धावांवर भारताचे दोन्ही सलामीवीर वीरेंद्र सहवाग आणि वसीम जाफर माघारी परतले. दोन गडी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरने फलंदाजीसाठी मैदानात उतरणं अपेक्षित होतं. परंतु, सचिन मैदानात उतरू शकत नव्हता. कारण, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो १८ मिनिटांसाठी मैदानाबाहेर होता. परिणामी भारताचा डाव सुरू झाल्यानंतर सचिनने १८ मिनिटं मैदानाबाहेर थांबणं बंधनकारक होतं. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा सौरव गांगुलीला मैदानात उतरावं लागणार होतं.

जाफर बाद झाल्यावर गांगुलीने मैदानात जाणं अपेक्षित असलं तरी तो मैदानात जाण्यासाठी सज्ज झाला नव्हता. गांगुली त्यावेळी ड्रेसिंग रूमबाहेर ट्रकसूट घालून फिरत होता. तर व्हीव्हीएस लक्ष्मण अंघोळीला गेला होता. अशा वेळी भारतीय संघाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडू गांगुलीला तयार करू लागले. एक जण त्याच्या पायांना पॅड बांधत होता, एकजण थायपॅड लावत होता, एक खेळाडू त्याचे ग्लोव्हज घेऊन आला, दुसरा खेळाडू हेल्मेट घेऊन उभा होता, असे सगळेजण गांगुलीला सज्ज होण्यासाठी मदत करत होते. एवढा सगळा खटाटोप करूनही गांगुलीला मैदानात पोहोचण्यासाठी तब्बल सहा मिनिटं उशीर झाला होता. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पंचांशी काहीतरी चर्चा करत होते. तर मैदानावर उभा असलेला भारताचा कर्णधार राहुल द्रविड या सगळ्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ होता. त्यालाही कळत नव्हतं नेमकं काय झालंय. सचिन, गांगुली किंवा लक्ष्मण यांच्यापैकी कुठलाच खेळाडू मैदानावर का येत नाहीये, असा प्रश्न द्रविडला पडला होता.

हे ही वाचा >> “हेल्मेट रागाच्या भरात फेकून…”, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, “आयुष्यात…”

तब्बल सहा मिनिट उशिराने मैदानात आलेल्या गांगुलीला पाहून पंचांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला नियमांची कल्पना दिली. परंतु, स्मिथने टाईमआऊटचं अपील केलं नाही. तो केवळ हसला आणि क्षेत्ररक्षणासाठी त्याच्या जागी निघून गेला तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आपापल्या जागी परतण्याचा इशारा केला. स्मिथने त्यावेळी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. त्यामुळे सौरव गांगुली टाईमआऊट झाला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sourav ganguly not timed out even when 6 minutes late in ind vs sa cape town match 2007 asc

First published on: 07-11-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×