Sourav Ganguly Reveals VVS Laxman Didn’t Speak To Him For 3 Months: भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द यशस्वी कारकीर्दींपैकी एक होती. तरीही, या महान फलंदाजाला कधीही एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. डिसेंबर २००२ मध्ये त्याला २००३ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी दिनेश मोंगियाची निवड करण्यात आली होती. या निर्णयामुळे तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांच्यात अबोला निर्माण झाला होता. लक्ष्मण खूप दुखावला होता आणि गांगुलीशी तीन महिने बोलला नव्हता. याबाबतचा खुलासा खुद्द सौरव गांगुलीने केला आहे.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेसाठी लक्ष्मण आणि मोंगिया यांच्यापैकी एकाचीच निवड होणार होती. लक्ष्मणची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी फारशी प्रभावी नव्हती. त्याने केवळ २७.५५ च्या सरासरीने १२४० धावा केल्या होत्या. त्यामुळे मोंगियाने त्याच्या क्षेत्ररक्षण कौशल्यामुळे संघात स्थान मिळवले.
पीटीआयशी बोलताना सौरव गांगुलीने याबाबत भाष्य केले आहे. विश्वचषक संघाच्या घोषणेनंतर लक्ष्मण “नाखूश आणि स्वाभाविकपणे नाराज होता. त्यामुळे लक्ष्मण गांगुलीशी तीन महिने बोलला नव्हता.
गांगुली म्हणाला, “असे अनेक वेळा घडले आहे की, जेव्हा आम्ही खेळाडूंना विश्रांती द्यायचो, तेव्हा ते नाराज व्हायचे. लक्ष्मणला विश्वचषकातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने तो माझ्याशी बोलला नव्हता. नंतर मी त्याच्याशी समेट केला. विश्वचषक संघातून वगळल्यानंतर कोणताही खेळाडू नाराज होणे स्वाभाविक आहे. जेव्हा विशेषतः लक्ष्मणसारखा दर्जेदार खेळाडू असतो. तो नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी केल्यानंतर तो आनंदी होता.”
दरम्यान, २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून जेतेपद पटकावले होते.
गांगुली पुढे म्हणाला, “विश्वचषक स्पर्धेनंतर लक्ष्मणने एकदिवसीय संघात पुनरागमन केले. त्याने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जिंकलो आणि व्ही. व्ही. एस. ने त्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली.”