एपी, एन्शेडे (नेदरलँड्स)
अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना आघाडीपटू जोसेलूने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर स्पेनने इटलीवर २-१ अशी सरशी साधत नेशन्स लीग फुटबॉलची अंतिम फेरी गाठली.
नेदरलँड्स येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत स्पेनने बराच वेळ चेंडू आपल्याकडे राखला, तर इटलीने भक्कम बचाव करताना प्रतिहल्ला करण्यावर भर दिला. या सामन्याची सुरुवातच रंगतदार झाली. तिसऱ्या मिनिटाला येरेमी पिनोने गोल झळकावत स्पेनला आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ आठ मिनिटेच टिकू शकली. ११व्या मिनिटाला इटलीला पेनल्टी मिळाली. यावर चिरो इमोबिलेने गोल करत इटलीला १-१ अशी बरोबरी करून दिली.
यानंतर मात्र दोन्ही संघांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. त्यामुळे उत्तरार्धात टप्प्याटप्प्याने दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच बदली खेळाडू मैदानावर आणले. यापैकीच एक जोसेलूने निर्णायक कामगिरी केली. ८८व्या मिनिटाला मध्यरक्षक रॉड्रीने मारलेला फटका इटलीच्या बचावपटूंना लागून गोलसमोर उभ्या जोसेलूकडे गेला आणि जोसेलूने चेंडूला गोलजाळय़ाची दिशा देत स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर स्पेनने चेंडूवर ताबा राखताना विजय साकारला.
आता रविवारी होणाऱ्या नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात स्पेनसमोर क्रोएशियाचे आव्हान असेल. क्रोएशियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान नेदरलँड्सला ४-२ अशा फरकाने नमवले होते.
२स्पेनने दुसऱ्यांदा नेशन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. २०२१मध्ये स्पेनने इटलीलाच नमवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, पण त्यांना फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला होता.