फॉम्र्युला वनचा सम्राट मायकेल शुमाकर याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा विश्वास त्याची पत्नी कोरिना हिने व्यक्त केला असल्याचे येथील एका मासिकाने वृत्त दिले आहे. कोरिना हिने एका जर्मन मासिकास दिलेल्या मुलाखतीत मायकेलच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्याचे म्हटले आहे. फ्रान्समध्ये डिसेंबर महिन्यात मायकेल याला स्केटिंग करताना अपघात झाला होता व त्यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ग्रेनोबल येथील एका रुग्णालयात तो १७० दिवस होता. तो बेशुद्धावस्थेतून बाहेर आल्यानंतर त्याला शारीरिक पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले आहे.
जलतरण : विनित मानेला सुवर्ण
मुंबई : इंदूर येथे झालेल्या ३१व्या सबज्युनियर राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या विनित मानेने ५०मी बॅकस्ट्रोक प्रकारात ३२.५१ सेकंदांत अंतर पार करत तेरा वर्षे जुना विक्रम मोडला. १२ वर्षांखालील मुलींमध्ये केनिशी गुप्ताने ५० मी बॅकस्ट्रोक प्रकारात ३३.७२ मिनिटांत अंतर पार करत सुवर्णपदकावर कब्जा केला. १० वर्षांखालील गटात अनन्या पांडेने ५०मी ब्रेस्टस्ट्रोक तर एइका छात्राने ५० मी बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
स्क्वॉश : राहुल बैथा अंतिम फेरीत
मुंबई : इंडियन स्क्वॉश प्रोफेशनल्स आयोजित अखिल भारतीय स्क्वॉश महोत्सवात अव्वल मानांकित राहुल बैथा याने अंतिम फेरीत मजल मारली. १५ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत त्याने बिगरमानांकित अविनाश यादवचे आव्हान ११-९, ११-५, ११-९ असे तीन गेममध्ये परतवून लावले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तुषार शहानी याने चौथ्या मानांकित सूरज चांद याला ११-६, ११-४, ११-० असा पराभवाचा धक्का दिला. १३ वर्षांखालील मुलांमध्ये, दीपक मंडलने नील जोशीला १२-१०, ११-८, ११-६ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अद्वैत आदिकने तनय पंजाबीला ११-८, ९-११, ११-८, ११-६ असे पराभूत केले.
सीसीआय, शिवाजी पार्क अंतिम फेरीत
मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना पंटर्स आणि सीसीआय बिलियर्ड्स बॉईज् या संघांनी आपापले सामने जिंकत पीजे हिंदू जिमखाना आयोजित विल्सन जोन्स मुंबई बिलियर्ड्स लीग स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली. शिवाजी पार्क जिमखान्याने चेंबूर जिमखाना ग्लॅडिएटर्स संघाचा ४५८-३५१ असा पराभव केला. दीपेंद्र पिंकयार आणि शेखर सुर्वे यांनी शिवाजी पार्क जिमखान्याकडून चांगला खेळ केला. सीसीआयने पीजे हिंदू जिमखाना सुल्तान ऑफ हझार्ड्स संघावर ४२५-३३३ अशी मात केली. सीसीआयच्या विजयात हितेश कोटवानी आणि देवेंद्र जोशी चमकले.
बुद्धिबळ : अनीषला संयुक्त आघाडी
पुणे : महाराष्ट्राच्या अनीष गांधीने अन्य २३ खेळाडूंसह कुमारांच्या (१९ वर्षांखालील) राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीअखेर संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. अनीषने तामिळनाडूच्या जी. आकाशवर सहज विजय मिळविला. महाराष्ट्राच्या शार्दूल गागरेने केरळच्या एस. श्रीशनला बरोबरीत रोखले. महाराष्ट्राच्या अथर्व गोडबोले व अभिमन्यू पुराणिक यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. मुलींमध्ये, महाराष्ट्राच्या आकांक्षा हगवणेने तामिळनाडूच्या जी. के. मनीषा हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला.