सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतोच, असे म्हणत कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हरभजनने संन्यास घेतल्यानंतर एस. श्रीसंतने त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. हरभजनने संन्यास घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडसहीत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. असं असतानाच श्रीसंतनेही हरभजनसाठी ट्विट केलंय. आयपीएल २००८ मध्ये हरभजनने श्रीसंतला कानाखाली लगावल्याचं सांगितलं जातं. यानंतर श्रीसंत मैदानामध्येच रडू लागला होता. यानंतर बराच वादही झाला होता. मात्र आता हरभजन निवृत्त झाल्यानंतर श्रीसंतने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.

श्रीसंतने हरभजनसोबतचे चार फोटो ट्विट करत त्याला निवृत्तीनंतरच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. हरभजनला टॅग करुन श्रीसंतने, “हरभजन सिंह तू कायमच फक्त भारतासाठी नाही तर जगामध्ये क्रिकेट खेळलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहशील. मी तुला ओळखतो आणि मला तुझ्यासोबत खेळण्याची संधी मिळाली हा मी फार मोठा सन्मान समजतो. मी कायमच तुझ्यासोबतचे चांगले क्षण लक्षात ठेवेन. तुला फार सारं प्रेम आणि आदर”, असं म्हटलं आहे.

काय घडलं होतं?
२००८ साली हरभजन आणि श्रीसंतमध्ये आयपीएल सामन्यानंतर वाद झाला होता. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यानंतर हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारली होती. त्यानंतर श्रीसंत मैदानातच रडू लागला होता. या दोघांचेही फोटो त्यावेळी प्रचंड चर्चेत होते.

हरभजनची कारकिर्द…
४१ वर्षीय ऑफ-स्पिनर हरभजनची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. त्याने १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ४१७, २६९ आणि २५ मोहरे टिपले. ‘‘सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतोच आणि मला आयुष्यात सारे काही मिळवून देणाऱ्या खेळाला मी अलविदा करत आहे. माझा हा २३ वर्षांचा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय व्हावा यासाठी हातभार लावलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो. जालंधरच्या छोट्या गल्ल्यांपासून सुरू झालेला ते भारतीय संघाचा ‘टर्बनेटर’ होण्याचा हा २५ वर्षांचा प्रवास खूपच सुंदर होता,’’ असे हरभजनने ‘ट्वीट’मध्ये लिहिले.

भारतीय जर्सीमध्ये निवृत्त होण्याची होती इच्छा…
१९९८ मध्ये शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजनने मार्च २०१६मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला. भारतीय जर्सीत निवृत्त होण्याची त्याला आशा होती; पण ते शक्य होऊ शकले नाही. ‘‘तुम्हाला कधी तरी अवघड निर्णय घ्यावे लागतात. मानसिकदृष्ट्या मी काही काळापूर्वीच निवृत्त झालो होतो; पण घोषणा करणे मला शक्य होत नव्हते,’’ असे हरभजनने सांगितले.

सचिन म्हणाला, “तुझा अभिमान वाटतो”
यशस्वी कारकीर्दीबद्दल हरभजनचे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले. ‘‘खूपच सुंदर आणि परिपूर्ण कारकीर्द, भज्जी! आपली १९९५ मध्ये पहिल्यांदा भेट झाली आणि तेव्हापासून तू असंख्य सुरेख आठवणींचा भाग आहेस. तुझी कायमच संघासाठी काहीही करण्याची तयारी असायची. तुझ्यासोबत एकाच संघातून खेळताना खूप मजा यायची. तू प्रदीर्घ कारकीर्दीत भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केलीस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, ’’ असे सचिन म्हणाला.

सर्वोत्तम कामगिरी ठरली ऑस्ट्रेलियाविरुद्ध…
२००१ मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटीत  विक्रमी ३२ बळी मिळवणे ही हरभजनच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. तसेच तो २००७च्या ट्वेन्टी-२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. ‘आयपीएल’मध्ये तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाकडून खेळला.